मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजपने मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळपास निश्चित केल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडे कोणती जबाबदारी दिली जाईल याची चर्चा आता रंगली आहे. दरम्यान शिंदे यांना केंद्रीय मंत्रीपद दिले जाणार असल्याचे बोलले जात आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी त्याबाबत सूचक विधान केले आहे. त्यांनी एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत आलं पाहिजे. त्यांनी दिल्लीत योगदान दिलं पाहिजे असेही आठवले यांनी सांगितले. त्यामुळे या चर्चेला उधाण आले आहे.
आज सकाळीज एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यापालांना सुपूर्द केला. यावेळी राज्यपालांनी शपथविधीपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम बघण्याच्या सूचना केली. राज्याच्या विधानसभेची मुदत ही २६ नोव्हेंबर पर्यंत होती. ती आता संपल्याने मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागतो. त्यामुळे हा राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे उपस्थितीत होते.
पण, या राजीनाम्यानंतर आठवले यांचे वक्तव्य आले आहे. या वक्तव्यात तथ्य सुध्दा आहे. मुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीला उपमुख्यमंत्री करणे महायुतीला परवडणारे नाही. त्यामुळे त्यांना केंद्रीय मंत्रीपद दिले तर त्यांना देशाच्या राजकारणात वेगळे स्थान निर्माण करता येईल. त्यामुळे या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
यामुळे भाजपचा निर्णय
महायुतीला २३० जागा मिळाल्या असून त्यात भाजप १३२ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर महायुतीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाला ५७ तर अजित पवार गटाला ४१ जागा मिळाल्या आहे. सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने त्यासाठी आपलाच मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.