इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
दापोलीः कोकण आणि शिवसेना यांना कोणीही वेगळे करू शकत नाही. कोकणातील माणसे ही बाहेरून काटेरी आणि आतून गोड आहेत. त्यामुळे येथील माणसे विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
महायुतीचे उमदेवार योगेश कदम यांच्या प्रचारासाठी दापोली येथे मुख्यमंत्री शिंदे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी त्यांनी युतीच्या उमदेवारांसाठी मतदारांना आवाहन केले. बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा झेंडा हातात घेऊन योगेश कदम हे उभे आहेत. त्यामुळे येणाऱ्या २३ तारखेला त्यांचाच गुलाल उधळायचा असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले. फटाके एवढे फोडा की, त्याचा आवाज बांद्रापर्यंत पोहोचला पाहिजे, अशा शब्दांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. आता रत्नागिरीमध्ये २३ तारखेला गुलाल उधळणार आहे, दिवाळी साजरी करायची असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
दापोलीमध्ये आपल्याला विकासाची गंगा आणायची आहे. साडेतीन हजार कोटी रुपयांची विकासकामे आपल्या सरकारने येथे केली आहेत; मात्र यापूर्वीचे मुख्यमंत्री भेटतच नव्हते, त्यामुळे निधी मिळणार कुठून? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला; मात्र आता घेणारे सरकार नाही तर देणारे सरकार आहे. राज्यांमध्ये आधीच महायुतीचे सरकार स्थापन व्हायला हवे होते; मात्र ठाकरे हे काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले, अशा शब्दात शिंदे यांनी निशाणा साधला.
आम्ही कोणालाही घाबरत नाही. कोणाला धमक्या देत आहात, असा प्रश्न शिंदे यांनी उपस्थित केला. आमची नियत साफ आहे. मतदान झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेचे डिसेंबरचे पैसेदेखील महिलांच्या खात्यात जमा होतील, असे आश्वासन देखील शिंदे यांनी दिले आहे.