छत्रपती संभाजीनगरः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला थेट समोरासमोर येऊन चर्चा करण्याचे आव्हान दिले. वैजापूरमध्ये रमेश बोरनारे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलताना त्यांनी, “महाविकास आघाडीने अडीच वर्षात काय केले आणि आम्ही काय केले. याची खुली चर्चा करायला मी तयार आहे; मात्र विरोधक हे आव्हान स्वीकारायला नाही. कारण त्यांनी अडीच वर्षांत काहीही केले नाही”, अशी टीका केली.
विरोधकांवर टीकास्र सोडताना शिंदे म्हणाले, की महाविकास आघाडीच्या सरकारने अडीच वर्षांत अनेक विकास प्रकल्पांना स्थगिती दिली. राज्यात अडीच वर्ष स्थगिती सरकार होते. त्या वेळी मंदिरे इतर प्रार्थनास्थळेही बंद केली होती; मात्र महायुतीचे सरकार आले आणि आपण राज्यातील सगळी मंदिरे उघडली. तसेच स्थगिती मिळालेल्या सगळ्या योजना पुन्हा सुरू केल्या. मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीरनाम्याच्या मुद्द्यावरूनही महाविकास आघाडीला लक्ष्य केले. “महाविकास आघाडीने आमचा वचननामा चोरून त्यांचा जाहीरनामा प्रकाशित केला आहे. कॉपी पेस्ट करून जाहीरनामा बनवता येत नाही, हे त्यांना माहिती नाही”, अशी टीका त्यांनी केली.
“महायुतीचा जाहीरनामा म्हणजे फक्त ट्रेलर आहे. संपूर्ण सिनेमा अजून यायचा बाकी आहे. आम्ही लाडकी बहीण योजनेत महिलांना १५०० वरून २१०० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही शेतकरी सन्मान योजनेचा निधीदेखील वाढवला आहे. प्रत्येकाच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी सरकारने प्रयत्न केले आहेत”, असे शिंदे यांनी सांगितले.