इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आपल्या घरात जशी आपली लेक लाडकी असते तशीच सूनही लाडकी असायला हवी. तिला योग्य वागणूक देऊन सन्मानाने वागवायला हवे, आणि जे असे करणार नाहीत त्यांना आता शिवसेना महिला आघाडी योग्य पद्धतीने धडा शिकवणार आहे. त्यासाठी ‘लाडक्या सुनेचे रक्षण हेच शिवसेनेचे वचन’ हे अभियान हाती घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
ठाणे जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने गडकरी रंगायतन येथे ‘खेळ मंगळागौरीचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या समारोपाला उपस्थित राहून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही घोषणा केली.
ते पुढे म्हणाले की, राज्यातील महायुतीचे सरकार हे लाडक्या बहिणींनी आणलेले सरकार आहे. त्यामुळेच मी कालही म्हणालो लाडक्या बहिणींनी फिरवली जादूची कांडी आणि उडवून टाकली विरोधकांची दांडी, त्यामुळे तुमच्यासाठीच आम्ही लाडकी बहिण योजना सुरू केली आणि ती यशस्वी करून दाखवली. आज कुणी कितीही आणि काहीही म्हणाले तरी ही योजना कधीही बंद होणार नाही.
महिला कुटुंबासाठी सर्व काही करतात, पण स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे आपली नियमित तपासणी करून घेण्यासाठी ठाणे मनपा आणि रोटरी क्लबच्या पुढाकाराने ‘उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियान’ सुरू करण्यात आले असून जास्तीत जास्त महिलांनी त्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
यावेळी सौ.लता एकनाथ शिंदे, ठाणे जिल्हा महिला संघटिका सौ.मीनाक्षी शिंदे, माजी उपमहापौर सौ.पल्लवी कदम, माजी नगरसेविका सौ.नम्रता भोसले-जाधव तसेच शिवसेनेच्या ठाणे जिल्ह्यातील सर्व महिला आवर्जून उपस्थित होत्या.