मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने आज मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेला वर्षा बंगला दुमदुमून गेला. आपल्या मनातील दुःख वेदना दूर सारत त्यांनी मोठ्या आनंदाने गणरायाची आरती केली. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आधारवड ठरलेल्या त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रमशाळेतील मुलांना खास आमंत्रित करण्यात आले होते.
या मुलांनी शाळेला ये-जा करण्यासाठी पायपीट करावी लागते अशी अडचण सांगितली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी या मुलांसाठी बस उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. त्यावर तातडीने अंमलबजावणी करत सायंकाळपर्यंत नवी कोरी बस वर्षा येथे आणून या आश्रमशाळेचे महंत श्री शिवस्वरुपानंद यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
दरम्यान, दुपारी ही मुले राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान नक्की असते तरी कसे याबद्दल मनात प्रचंड कुतूहल बाळगत वर्षा निवासस्थानी आली होती. या सर्वांनी वर्षा निवासस्थानी प्रतिष्ठापित गणपती बाप्पाचे मनोभावे दर्शन घेतले. यानंतर ढोल ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात त्यांनी श्री गणरायाची आरती केली. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत ही आरती चांगलीच रंगली. आरती सुरू असतानाच मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचेही आगमन झाले आणि त्यांच्या सोबत मुलांनी आरती केली. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्र्यांच्या स्नुषा श्रीमती वृषाली शिंदे, माजी खासदार हेमंत पाटील, त्यांच्या पत्नी श्रीमती राजश्री पाटील आदी उपस्थित होते.
या श्री गणेश दर्शनाच्या निमित्ताने या मुलांसाठी स्नेह भोजनाचेही आयोजन केले होते. यात ही मुले अंगात शेतकरी सदरे, डोक्यावर टोपी घालून मोठ्या शिस्तीने टेबल खुर्चीवर येऊन बसली. त्यांच्यासाठी आज पंचपक्वांनांचा थाट होता. या भिरभिरत्या नजरेच्या मुलांनी जेवायला सुरूवात केली पण ती पदार्थ पुन्हा मागून घेणे किंवा समोर दिसत असलेले पदार्थ घ्यायला लाजत होती. अखेरीस मुख्यमंत्र्यांनी त्यांची ही अडचण ओळखली आणि ते सरसावले. मुख्यमंत्री श्री. शिंदे स्वतः एकेक पदार्थ घेऊन मायेने त्यांना आग्रह करून वाढू लागले. मुख्यमंत्र्यांनी या मुलांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. आधारतीर्थ आश्रमाला जाणवणाऱ्या काही अडचणी मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतल्या. तसेच त्या तत्काळ सोडवण्याचे निर्देशही दिले.
सायंकाळी वर्षा निवासस्थानाच्या प्रांगणात नवीन बस आणण्यात आली. मंत्रोच्चारात तिचे पूजन करून मुख्यमंत्र्यांनी ही बस आश्रमाला सोपवली. मुखयमंत्री श्री. शिंदे यांनी दुपारी ऐकून घेतलेली अडचण सायंकाळपर्यंत सोडवल्याचे पाहून ही मुले भारावून गेली. त्यांनी टाळ्यांच्या गजरात मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. या सगळ्या मुलांनी मुख्यमंत्र्यांचे आदरातिथ्य स्वीकारत आणि मनात वर्षा बंगल्याच्या गोड आठवणी ठेवून नव्या कोऱ्या बसमध्ये बसून या भारावल्या नजरेने वर्षाचा निरोप घेतला.