मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महायुतीच्या नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेईल की नाही हा सस्पेंन्स आता संपला आहे. आजच्या शपथविधी सोहळ्यात ते शपथ घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते सरकारमध्ये सामील होईल की नाही यावर कोणताही निर्णय झाला नव्हता.
पण, आज त्यांनी सरकारमध्ये सामील होऊन उपमुख्यमंत्रीपद घेण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्रीपदावर राहिलेल्या नेत्याने उपमुख्यमंत्रीपद स्विकारणे तसे अवघड असते. पण, गेल्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी स्विकारले होते. त्यानंतर आता शिंदे स्विकारणार आहे.
शिवसेनेच्या आमदारांनी तुम्ही उपमुख्यमंत्रीपद न स्विकारल्यास आम्ही मंत्रिमंडळात सामील होणार नाही अशी भूमिका घेतल्यानंतर शिंदे यांनी हे पद स्विकारण्यास सहमती दिली. देवेंद्र फडणवीसांनी सुध्दा गेल्या दोन दिवसांपासून प्रयत्न सुरु केले होते. त्यांच्या प्रयत्नांना सुध्दा यश आले. दरम्यान आज मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री हेच शपथ घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे.