इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आजारातून बरे झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बैठकीचा सपाटा लावला. त्यांनी आज मुंबईतील दादर येथे ६ डिसेंबर रोजी होणाऱ्या महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या. रात्री देवेंद्र फडणवीस त्यांना भेटण्यासाठी वर्षावर गेले. त्यानंतर त्यांच्यात चर्चा झाली.
या बैठकीबरोबरच मंत्री गिरीष महाजन यांच्याशी बंद दाराआड त्यांनी चर्चा केली. गेले काही दिवस ते नाराज असल्याची चर्चा होती. पण, आज भाजपच्या नेत्यांनी त्यांच्याशी संवाद साधत नाराजी दूर केल्याचे बोलले जात आहे.
महापरिनिर्वाण दिनाची तयारी
महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्त येणाऱ्या अनुयायांना राहण्यासाठी तंबू, आरोग्य सुविधा, पुरेशी शौचालये, जेवण्याची तसेच पिण्याच्या पाण्याची सोय, जागोजागी मदत कक्ष स्थापन करावे. येणाऱ्या गर्दीचे योग्य नियोजन करावे, असे निर्देश शिंदे यांनी या बैठकीत दिले. या बैठकीला माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, नागसेन कांबळे हे देखील व्हीसीद्वारे उपस्थित होते.