इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
छत्रपती संभाजीनगरः महाविकास आघाडी सरकार विकासाचे मारेकरी होते. उद्धव ठाकरे यांनी राज्यातील लोकांना अंधारात ढकलले असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ठाकरे यांनी अडीच वर्ष महाराष्ट्रावर दरोडा टाकल्याचा आरोप त्यांनी केला.
दरोडेखोर कोण विकास करणारे की विकासाचे मारेकरी? ज्यांनी अडीच वर्षात या महाराष्ट्रात फक्त दरोडाच टाकला. लोकांना अंधारात ढकलले. राज्याला दहा वर्षे मागे नेले. सर्व विकासकामे बंद केली. मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प, जलयुक्त शिवार, समृद्धी महामार्ग, मेट्रो बंद हे सर्व प्रकल्प बंद केले. या लोकांनी कोविडमध्येदेखील कोविड सेंटरमध्ये, खिचडीमध्ये, डेड बॉडीच्या बॅगमध्ये घोटाळा केल्याचा आरोप शिंदे यांनी केला. त्यामुळे ते दरोडा टाकणारे आहेत. आम्ही अडीच वर्षात विकास केला. कल्याणकारी विकास योजना आणल्या. विकास आणि कल्याणकारी योजना याची सांगड घातली त्यामुळे जनतेला माहीत आहे दरोडा कुणी टाकला, असे मुख्यमंत्री म्हणाले.