ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेच्या वतीने कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भव्य रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी मोठे शक्तीप्रदर्शन केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी ठाण्यातील आनंदआश्रमात जाऊन हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय गुरुवर्य आनंद दिघे साहेबांचे आशीर्वाद घेतले. त्यांच्या विचारांवर चालणारे सरकारची दोन वर्षे यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर त्यांच्या आशीर्वादाने या राज्यात महायुतीचे सरकार नक्की येईल असा विश्वास यावेळी व्यक्त केला. तसेच त्यानंतर वागळे इस्टेट येथील दत्त मंदिरात जाऊन श्री दत्त गुरूंचे आशीर्वाद घेतले.
यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, ठाणे जिल्हा महिला संघटिका सौ. मिनाक्षी शिंदे, ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार, ज्येष्ठ शिवसैनिक उद्धवराव जगताप, माजी नगरसेवक पवन कदम उपस्थित होते.
घरी औक्षण
सकाळी घरी पत्नी सौ. लता शिंदे आणि सून सौ. वृषाली शिंदे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे औक्षण करून विजयासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि नातू रुद्रांश उपस्थित होते.
संत एकनाथ महाराजांच्या वंशजाचा आशीर्वाद…
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी संत एकनाथ महाराजांचे वंशज योगीराज महाराज गोसावी यांनी येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांन शुभाशीर्वाद दिले. आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला प्रचंड मताधिक्याने विजय मिळावा यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सर्व सहकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.