इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुण्यातील उच्चभ्रू खराडी भागात रेव्ह पार्टीत पोलिसांनी छापेमारी करुन ३ महिला आणि २ पुरुषांना ताब्यात घेतले असून त्यात एकनाथ खडसे यांचा जावई प्राजंल खेवलकर यांना सुध्दा या प्रकरणात अटक झाली. त्यानंतर या कारवाईबाबत आता प्रश्न उपस्थित केले जात आहे. प्रसिध्द वकील असीम सरोदे यांनी NDPS कायदा आणि डॉ प्रांजल यांच्या केसबाबत सांगितले की, पोलिसांनी या प्रकरणी चौकशी दरम्यान अनेक कायदेशीर चुका केल्या आहेत. काही लोकांना ‘आरोपी’ म्हणून बदनाम करण्यासाठी त्यांच्या घरात घुसून शूटिंग करणे तो व्हिडिओ व्हायरल करणे पोलिसांना भोवणार. इतरांच्या खाजगी आयुष्याचा अपमान करणारे हे कोणते पोलिसिंग आहे? राजकीय हेतुप्रेरित पोलिसिंग बंद करण्यासाठी पावले उचलणार असल्याचे त्यांनी म्हटले. तर दुसरीकडे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंमली पदार्थांच्या सेवनाची चाचणीचा अहवाल तर बदलला जाणार नाही ना? अशी शंका उपस्थितीत केली.
खडसे यांनी सांगितले की, डॉ. खेवलकर यांचा वैद्यकीय अहवाल आला असल्याचे काही वृत्तवाहिनींच्या माध्यमातून कळले. इथे एक साधा प्रश्न पडत आहे की मद्य सेवनाच्या चाचणीचा अहवाल इतक्या तात्पर्यतेने येतो, तो माध्यमांमध्ये प्रसिद्ध होतो मग अंमली पदार्थांच्या चाचणीचा अहवाल येण्यास इतका वेळ का लागत आहे ? मागच्या वर्षी पुण्यात जे पोर्शे अपघात प्रकरण झाले होते. त्यात आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्याचा इतिहास या ससून रुग्णालयाला लाभला आहे याची सहज आठवण झाली. त्यामुळे डॉ. खेवलकर यांच्या अंमली पदार्थांच्या सेवनाची चाचणीचा अहवाल तर बदलला जाणार नाही ना ? अशी शंका उपस्थित होत आहे.
शनिवारी प्राजंल खेवलकर यांना फ्लॅटमध्ये पार्टी करताना पोलिसांकडून अटक करण्यात आली. खराडी येथील एका सोसायटीतील फ्लॅटमध्ये ही पार्टी सुरु होती. यात प्राजंल यांचा एक मित्र आमित तीन महिला पार्टीत सहभागी झाल्या होत्या. या पार्टीत दारु, हुक्का, आणि काही प्रमाणात अंमली पदार्थांचे सेवन होत असल्याचा पोलिसांनी दावा केला होता. आता या दाव्यावरच प्रश्न उपस्थितीत करण्यात आले आहे.