जळगाव – जिल्ह्याच्या राजकारणात (Jalgaon Politics) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना ठाण्यात ट्रिटमेंटची गरज असल्याचं म्हंटल होतं. त्यानंतर आता खडसे यांनी गिरीश महाजनांना उत्तर दिलं आहे. “गिरीश महाजन यांना पुण्याच्या बुधवार पेठेत पाठवावं लागेल”, अशी शब्दात एकनाथ खडसे यांनी टोला लगावला आहे. कालच नाथाभाऊंनी ”मोक्काच्या भितीने गिरीश महाजनांना कोरोना झाला का ?” असा प्रश्न केल्यानंतर आ. महाजन यांनी त्यांना ठाण्याच्या ट्रिटमेंटची गरज असल्याची टीका केली होती. यावरून नाथाभाऊंनी ठाण्यावरून थेट बुधवार पेठेचाच दाखल दिल्याने दोन्ही नेत्यांमधील शब्दयुध्दाचा भडका उडाला आहे.
मोक्का कायद्याची चौकशी होणार असल्याचे समजताच महाजनांना कोरोना
काही महिन्यांपूर्वी एकनाथराव खडसे यांना दुसऱ्यांदा कोरोना झाला असता आ. गिरीश महाजन यांनी, ‘ईडीच्या तारखा पाहून खडसेंना कोरोना होतो’ अशी टीका केली होती. शनिवारी आ. गिरीश महाजन यांचा कोरोना अहवाल सकारात्मक आल्यानंतर खडेसे यांनी त्यावर प्रतिक्रिया देते वेळी म्हटले होते की, मला तर खरोखर कोरोना झाला होता परंतु सध्या मोक्का कायद्याची चौकशी होणार असल्याचे समजते. त्यामुळेच गिरीश महाजन यांना कोरोना झाला असावा असा मला संशय असल्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे म्हणाले होते.
गिरीश भाऊंना पुण्याच्या बुधवार पेठेत पाठवावे लागेल
खडसेंच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेत आ. महाजन यांनी त्यास जोरदार प्रत्युत्तर दिले होते. ‘नाथाभाऊंना ठाण्याच्या उपचाराची गरज आहे. राज्यात तुमचेच सरकार असून याच सरकारने दिलेली चाचणी खोटी आहे हे त्यांनी सिद्ध करावे असे खुले आव्हान आ.महाजन यांनी दिले होते. महाजनांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देत खडसेंनी जहरी टीका केली असून ‘नाथाभाऊला ठाण्याला पाठविण्याची गरज नसून गिरीश भाऊंना पुण्याच्या बुधवार पेठेत पाठवावे लागेल’ असे ते म्हणाले.
चाळीस वर्ष मी चांगला होतो, मात्र राष्ट्रवादीत जाताच ; खडसेंची भाजपवर टीका
जळगाव – राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी नुकतंच जळगावातील रावेर येथे झालेल्या एका कार्यकर्ता मेळाव्यात भाजपवर (BJP) सडकून टीका केली आहे. चाळीस वर्ष जेव्हा मी तुमच्यासोबत होतो, तेव्हा चांगला होतो. मग आता राष्ट्रवादीत येताच माझ्या मागे ईडी (ED) लावली, असं म्हणत त्यांनी भाजपाला सुनावलं. “या पक्षाच्या विस्तारासाठी मी गावपातळीवर प्रयत्न केले, मेहनत केली आणि अनेक लोक घडवले. पक्षाच्या माध्यमातून मोठे केले. नाथाभाऊच्या आशीर्वादनं मोठे झाले. कोणी पंचायत समिती सदस्य, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य केले, जिल्हा परिषद अध्यक्ष केले. या ठिकाणी मेहनतीनं कष्टानं माणसं उभं केली आणि घडवली. ४० वर्ष रक्ताचं पाणी करत पक्षासाठी फिरत होते. ३० वर्षापूर्वी एकटा आमदार होतो. पुढं पक्ष वाढत गेला. गावोगावी पक्ष पोहोचला, साऱ्या समाजाला सोबत घेऊन जाण्याची मेहनत आम्ही केली,” अशी आठवण त्यांनी या मेळाव्यात बोलताना सांगितली. पुढे ते म्हणाले, “अलीकडचे राजकारण कशाप्रकारे चालते हे तुम्ही पाहत आहात. कोणाच्या मागे कशा ईडीच्या चौकशा लावल्या जाता ते देखील तुम्ही पाहताय. ४० वर्ष तुमच्या पक्षात होतो, तुमच्या सोबत होतो, तर मी चांगला होतो. एका वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेलो की मागं ईडी लावता. तारीख पे तारीख सुरु करता. ज्या माणसाच्या बळावर तुम्ही इतके दिवस उभे राहीले आणि आता त्याचा अपमान करता. त्याची फळं तुम्हाला भोगावी लागतील, जनता तुम्हाला येणाऱ्या काळात माफ करणार नाही,” असं एकनाथ खडसे म्हणाले.