नाशिकरोड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एकलहरे औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील राखेची वाहतूक थांबवा अन्यथा आम्ही आत्मदहन करू, असा इशारा एकलहरे येथील शेतक-यांनी महानिर्मिती केंद्र प्रशासनाला दिला आहे. शुक्रवारी झालेल्या एकलहरे ग्रामपंचायतिच्या विशेष ग्रामसभेत संतप्त शेतक-यांनी हा इशारा दिला.
एकलहरे वीज निर्मिती केंद्रातून तयार होणा-या राखेची वाहतूक नियमानुसार होत नसल्याने या भागातील प्रदूषणाची पातळी वाढून एकलहरेसह कोटमगाव, हिंगणवेढे, गंगापाडळी, सामनगाव येथील शेती धोक्यात आली आहे. यापूर्वी हा राखेचा डॅम बंद करण्याचा निर्णय झाला होता. मात्र ठेकेदारांच्या हितासाठी राखेचा डॅम पुन्हा सुरु करण्यात आल्याचा आरोप या ग्रामसभेत शेतक-यांनी केला. राखेची वाहतूक तात्काळ थांबवा अन्यथा एकलहरे औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या मुख्य अभियंत्यांच्या कार्यालयात आत्मदहन करू असा इशारा एकलहरे येथील शेतक-यांनी दिला. सरपंच मोहिनी जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या विशेष ग्रामसभेला राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजाराम धनवटे, ग्रामसेवक एस.जी. वाघ, उपसरपंच अशोक पवळे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे राजू सूर्यवंशी, वीज निर्मिती केंद्राचे उप अभियंता संतोष दुधाने यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी उपस्थित होते.
या ग्रामसभेची नोटीस देवूनही एकलहरे औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या मुख्य अभियंता नवनाथ शिंदे या ग्राम सभेला गैरहजर राहिल्याने शेतक-यांनी संताप व्यक्त केला. त्यांच्यावर कारवाईचा ठराव करण्याची मागणी शेतक-यांनी केली. मुख्य अभियंता जोपर्यंत ग्रामसभेला येत नाही तोपर्यंत राखेची वाहतूक बंद करण्याचा इशारा राजराम धनवटे यांनी दिला. त्यानंतर उपअभियंता संतोष दुधाने ग्रामसभेला हजर झाले. राखेच्या डॅममधून राखेची वाहतूक बंद करा नाहीतर शेतकरी आत्मदहन करतील असा इशारा बाळासाहेब पवळे यांनी ग्रामसभेत दिला. राख वाहतुकीसाठी अनामत रक्कम कंपनीकडे भरली आहे. आमचाही रोजगार बुडतो, अशी भूमिका राख वाहतूक करणा-या दादा राम शिंदे यांनी मांडली. अधिकारी ठेकेदारांकडून हफ्ते घेतात असा आरोप देखील शेतक-यांनी केला. बेकायदेशीर ट्रक राखेची वाहतूक करीत असल्याचा आरोप सागर जाधव यांनी केला. वीज निर्मिती केंद्र सुरू झाल्यापासून केवळ ठेकेदार, कंपन्या यांचाच केंद्र विचार करीत आहे, शेतकऱ्यांसाठी काय केले, असा सवाल शरद राजोळे यांनी केला. शेतकरी आक्रमक झाल्याने या ग्रामसभेला शेवटी वादळी स्वरूप प्राप्त झाले.