नाशिक – त्र्यंबकेश्वर तालुक्यातील धुमोडी गावात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात आठ वर्षीय शाळकरी मुलीचा मृत्यू झाला. गावात घराच्या अंगणात खेळत असतांना काल सायंकाळी बिबट्याने अचानक हा हल्ला केला. त्यानंतर तिला जबड्यातून गावाच्या झाडाझूडपांमध्ये फरपटत नेले. रुचिता एकनाथ वाघ असे या हल्ल्यात मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच वनकर्मचा-यांनी गावक-यांनी या मुलीचा शोध रात्री उशीरापर्यंत घेतला. त्यानंतर तीचा मृतदेह गावापासून एक कि.मी अंतरावर झाडाझूडपांमध्ये आढळून आला. गेल्या काही दिवसापासून या परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून याअगोदर तळवाडे शिवारात तीन बक-यांचा बिबट्याने फडशा पाडला. त्यानंतर ही घटना घडली आहे. या घटनेमुळे शाळकरी मुलांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.