नाशिक – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने 24 सप्टेंबर रोजी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार मोठ्या संख्येने गर्दी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनावर निर्बंध घातले आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या काही प्रमाणात नियंत्रणात असली तरी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ईद- ए- मिलाद (मिलादुन नबी) सण घरी राहूनच साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 24 सप्टेंबर 2021 रोजीच्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आवाहन केले आहे की, ‘कोविड-19’ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा ईद-ए-मिलाद (मिलादुन नबी) साजरा करण्यासाठी राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. या सूचनांचे सर्वांनी पालन करून हा सण शक्यतो घरी राहूनच साजरा करावा. तसेच या सणानिमित्त मिरवणूक काढावयाची असल्यास पोलिस प्रशासनाची पूर्व परवानगी घेण्यात यावी. या एका मिरवणुकीत जास्तीत जास्त पाच ट्रक आणि एका ट्रकवर जास्तीत जास्त पाच जणांना परवानगी अनुज्ञेय असेल. मिरवणुकीदरम्यान मास्क, सॅनेटायझर व सामाजिक अंतराचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच मिरवणुकीत ध्वनिप्रदूषण नियमांचे पालन करणे बंधनकारक असून त्याकरीता सक्षम प्राधिकारी यांच्या पूर्व परवानगीने ध्वनी प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात यावी, असेही जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी सांगितले आहे.
मिरवणुकीच्या दरम्यान स्वागतासाठी मंडप बांधण्यासाठी शासनाच्या नियमानुसार संबंधित महानगरपालिका, पोलिस व स्थानिक प्रशासनाने विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. या मंडपामध्ये एकावेळी किती उपस्थिती असावी याबाबत स्थानिक प्रशासनाने ठरविलेल्या विहित नमुन्यांचे पालन करणे आवश्यक आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 24 सप्टेंबर 2021 रोजीच्या शासन आदेशातील नियमांचे काटेकोरपणे पालन करून मास्क, सॅनेटायझर व सामाजिक अंतर राखून धार्मिक प्रवचनास परवानगी देण्यात येईल. प्रवचनाचे कार्यक्रम शासनाच्या नियमांचे पालन करुन शक्यतो ऑनलाईन पध्दतीने आयोजित करावेत. त्याचे स्थानिक केबल वाहिनी, फेसबुक अशा समाज माध्यमातून थेट प्रक्षेपणाव्दारे इतरांना पाहण्याची व्यवस्था करावी, असेही जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कळविले आहे.
ईद-ए-मिलादनिमित्त मिरवणुकीच्या मार्गावर मोहम्मद पैगंबर यांच्या स्मरणार्थ तात्पुरत्या लावण्यात येणाऱ्या पाणपोईंसाठी स्थानिक प्रशासनाची परवानगी घेण्यात यावी. तसेच त्याठिकाणी सीलबंद पाण्याच्या बाटल्यांचे वितरण करून तेथे पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी उपस्थित राहू नये. त्याचप्रमाणे या पाणपोईंच्या ठिकाणी स्वच्छता राखून सामाजिक अंतराचे पालन करण्यात यावे. प्रतिबंधित क्षेत्रात लागू असलेले निर्बंध कायम राहतील. त्यात कोणतीही शिथिलता देण्यात येणार नाही. कोविड-19 परिस्थितीचा विचार करता रक्तदान शिबिर, आरोग्य शिबीर आदी उपक्रम राबवावेत. या उपक्रमांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करावी, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी केले आहे.