नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा २८ वा दीक्षांत समारंभ गुरुवार दि. २३ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता विद्यापीठ आवारात होत आहे. या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. इंद्र मणी उपस्थित राहणार आहेत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे यावर्षी एकूण एक लाख ५५ हजार २३४ विद्यार्थी पदवी प्राप्त करीत आहेत. मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्याला नोंदणी केलेले स्नातक उपस्थित राहून पदवी स्वीकारणार आहेत, अशी माहिती विद्यापीठाचे कुलसचिव तथा परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील यांनी दिली.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा यंदाचा २८ वा दीक्षांत समारंभ आहे. विद्यापीठातील आठ विद्याशाखा व राज्यभरातील आठ विभागीय केंद्रे आणि सुमारे दोन हजारावर अभ्यासकेंद्रे यांच्यामार्फत विद्यापीठातर्फे राज्यभरात ज्ञानदानाचे कार्य केले जाते. यंदा विद्यापीठात विविध अभ्यासक्रमांसाठी पाच लाखाहून अधिक विद्यार्थी प्रविष्ट आहेत. पीएच. डी., एम. फील, पदव्युत्तर पदवी, पदवी व पदविका अशा विविध प्रकारच्या १०१ शिक्षणक्रमातील एक लाख ५५ हजार २३४ विद्यार्थ्यांना यंदा पदवी प्रदान केली जाणार आहे.
वैशिष्ट्ये –
– एक लाख ५५ हजार २३४ पैकी अमरावती विभागीय केंद्राचे २४५७१, औरंगाबादचे १५४७०, मुंबईचे १०२६५, नागपूरचे २०,५२६, पुणे २५३९०, कोल्हापूर १२०५६, नांदेड २२०७२ आणि नाशिक विभागीय केंद्राच्या २४८८४ विद्यार्थांचा समावेश आहे. यात एकूण एक लाख ६९३ पुरुष व ५४ हजार ५४१ स्त्रिया आहेत.
– पदवीधारकात ६० वर्ष वयावरील २०० विद्यार्थ्यांचा समावेश.
– विविध शिक्षणक्रम पूर्ण करून पदवी मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये विविध कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या ४८ बंदीजनांचा समावेश. त्यात अमरावती ८, मुंबई २, नागपूर २७, नाशिक १० आणि कोल्हापूर विभागीय केंद्रातील एका बंदीजन विद्यार्थ्याचा समावेश आहे. यात ३९ जणांनी बीए, एक बी कॉम, योग शिक्षक पदविकाधारक ४ तर मराठी विषय घेऊन एम ए करणारे ४ बंदीजन आहेत.
– एक लाख ५५ हजार २३४ पैकी पदविकाधारक २४५१८, पदव्युत्तर पदविकाधारक १२, पदवीधारक १ लाख १४ हजार ३२८, पदव्युत्तर पदवीधारक १६३६९, पी एच डी धारक ५ तर एम फीलधारक २ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
– पदवीधारक विद्यार्थ्यांमध्ये ११७ विद्यार्थी दृष्टीबाधित आहेत.
– दीक्षांत समारंभासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची यादी संकेत स्थळावर उपलब्ध आहे. समारंभाला उपस्थितीबाबत सर्व सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्यानुसार औपचारिकता पूर्ण करावयाच्या आहेत.
– दीक्षांत समारंभास विद्यार्थ्यांनी पांढऱ्या शुभ्र पोशाखात उपस्थित राहायचे आहे.
वैशिष्ट्यपूर्ण पदवीप्रमाणपत्रे
दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात येणारी प्रमाणपत्रे वैशिष्ट्यपूर्ण असून त्यावर विद्यार्थ्याचे रंगीत छायाचित्र देखील असणार आहे. विद्यार्थ्याचे गुणपत्रकावरील छायाचित्रच प्रमाणपत्रावर झळकणार आहे. शिवाय क्यू आर कोडही प्रमाणपत्रावर असून तो स्कॅन करून प्रमाणपत्राची वैधता पडताळणी करता येऊ शकेल. नवे प्रमाणपत्र हे पाणी अथवा अन्य द्रव पदार्थाने खराब होऊ नये याची काळजी घेण्यात आली असून सहजासहजी ते फाटणार नाही असा कागद वापरण्यात आला आहे. विद्यापीठाचा लोगो या पदवी प्रमाणपत्रावर वैशिष्ट्यपूर्ण गोल्ड फॉइलमध्ये मुद्रित करण्यात आला असून, या प्रमाणपत्रात विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आवश्यक सिक्युरिटी फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.
Education YCMOU Convocation Ceremony