पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतातील नवीन शैक्षणिक धोरण आणि पर्यावरण संरक्षणासाठी आता दक्षिण भारतातील विद्यापीठांनीही पुढाकार घेण्याचे निश्चित केले आहे. नेट झिरो या मोहिमेत ही सर्व विद्यापीठे सहभागी होणार आहेत. याद्वारे विविध महाविद्यालयांमध्ये पर्यावरण संवर्धनाची मोठी चळवळ उभी राहणार आहे. याचसंदर्भात चेन्नईमध्ये येत्या सोमवारी, २५ ऑक्टोबर तज्ज्ञांचे विचारमंथन होणार आहे. देशातील शिक्षण आणि पर्यावरण क्षेत्रात हा एक मैलाचा दगड ठरणार आहे.
पुण्यातील द ग्रीन तेर फाऊंडेशनच्या माध्यमातून देशभरातील विद्यापीठ आणि महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये पर्यावरण बचावासाठीचे अनमोल कार्य यापुढे घडणार आहे. पर्यावरणाचे अनन्यसाधारण महत्व लक्षात घेऊन फाऊंडेशनसोबत भारतीय तंत्रशिक्षण संचालनालय (एआयसीटीई)ने करार केला आहे. त्यामुळेच देशातील विविध विद्यापीठे आणि महाविद्यालये आता या उपक्रमात सक्रीय होत आहेत. पश्चिम भारतातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये हा उपक्रम सुरू झाला आहे. आता दक्षिण भारतातही त्याची मुहूर्तमेढ रोवली जात आहे. या उपक्रमाद्वारे उच्च शैक्षणिक संस्थांना कार्बन-न्यूट्रल कॅम्पस तयार करण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि साधनांसह प्रेरित केले जाणार आहे.
द ग्रीन तेर फाउंडेशन आणि एसआरएम इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या सहकार्याने चेन्नईमध्ये दक्षिण भारतासाठीची विशएष कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. इन्स्टिट्यूटच्या सभागृहात सकाळी ११ वाजता ही कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेत प्रतिष्ठित वक्ते आणि तज्ज्ञांचा सहभाग असणार आहे. निव्वळ-शून्य कॅम्पस उद्दिष्टे साध्य करण्याच्या विविध पैलूंवर यावेळी प्रकाश टाकला जाणार आहे. एसआरएम विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. सी. मुथामिझचेल्वन यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि ग्रीन तेर फाऊंडेशनचे संस्थापक संचालक आणि युनेपचे माजी संचालक डॉ. राजेंद्र शेंडे हे अध्यक्षस्थानी असतील.
माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री तथा खासदार श्री प्रकाश जावडेकर, एसआरएम ग्रुप ऑफ युनिव्हर्सिटीजचे कुलपती तथा खासदार डॉ. टी.आर. पारिवेंधर हे यांची यावेळी विशेष उपस्थिती असेल. कार्बन न्यूट्रॅलिटीकडे भारताचा मार्ग आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जागतिक तरुणांची भूमिका या विषयी या कार्यशाळेत विचारमंथन केले जाणार आहे. संयुक्त राष्ट्राचे अंडर सेक्रेटरी जनरल आणि नॉर्वेचे माजी पर्यावरण मंत्री डॉ. एरिक सोल्हेम हे “ग्लोबल यूथ फॉर नेट झिरो” या विषयावर व्हिडिओद्वारे मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यशाळेत परस्परसंवादी सत्रे आणि नेट-शून्य कॅम्पससाठी ओपन ऍक्सेस डेटा, मान्यता निकष, निव्वळ-शून्य कॅम्पससाठी तंत्रज्ञान, हरित वायू उत्सर्जन मोजण्यासाठी डिजिटल साधने, ऊर्जा कार्यक्षमता, अक्षय ऊर्जा, ग्रीन बिल्डिंग केस स्टडी आणि बरेच काही यावरील तज्ञांचे मार्गदर्शन असणार आहे. यावेळी विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या शंकांचे निरसनही केले जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली आहे की, २०७० पर्यंत भारतातील कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण शून्य टक्के असेल. याच्याच अंतर्गत शैक्षणिक संस्थांमध्ये नेट झिरो हा उपक्रम राबविला जात आहे. त्यास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभत आहे. यापुढील काळात उत्तर भारत आणि ईशान्य भारतातील शैक्षणिक संकुलेही लवकरच या उपक्रमात सहभागी होणार असल्याचे फाऊंडेशनचे संचालक डॉ. राजेंद्र शेंडे यांनी सांगितले आहे. त्यामुळेच आगामी काळात देशातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या माध्यमातून पर्यावरणस्नेही उपक्रमांची रेलचेल पहायला मिळणार आहे. याद्वारे विद्यार्थी हे प्रात्यक्षिकांमधूनच पर्यावरण रक्षणाचा संदेशही देणार आहेत. तसेच, त्यासाठी कटिबद्ध होणार आहेत.
Education South Indian Universities Net Zero Campaign