मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लहान वयापासून विद्यार्थ्यांच्या पाठीवर शिक्षणामुळे येणारे दप्तराचे ओझे कमी करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार पुढील शैक्षणिक सत्रापासून विद्यार्थ्यांचे दप्तर हलके होऊन त्यांना दिलासा मिळणार आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार, सर्व इयत्तांचे सर्व पाठ्यपुस्तके बदलली जाणार आहेत. त्याची अंमलबजावणी पुढील वर्षांपासून होणार आहे.
मागील काही वर्षांमध्ये विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. अनेक मुलांना पाठ, मान यांचे विकार झाले आहेत. काहींनी तर दप्तराच्या ओझ्यामुळेच शाळेत जाण्यास नकार दिला आहे. मुलांचे दप्तर कमीत कमी वजनी असावे, यासाठी बरेच प्रयत्न करण्यात येताहेत. शिक्षण विभागानेही यासाठी पुढाकार घेतला आहे. काही शाळांनी सुरुवातीच्या वर्गांसाठी बॅगलेस स्कूल अशी संकल्पना विकसित केली आहे. यात आता पुढील शैक्षणिक सत्रापासून विद्यार्थ्यांचे दप्तर अधिक हलके करण्याचा प्रयत्न शिक्षण विभाग करणार आहे.
विद्यार्थ्यांचे दप्तर हलके करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एकात्मिक पाठ्यपुस्तकांचा प्रयोग सुरू केला आहे. मात्र, पुढच्या वर्षी दप्तराचे ओझे आणखी कमी होणार असून, त्यासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात खास तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक धड्यानंतर शिक्षकांसाठी अध्यापनाच्या दृष्टीने दिल्या जाणाऱ्या सूचना पाठ्यपुस्तकातून वगळल्या जाणार आहेत. त्यामुळे पुस्तकाचा आकार जवळपास अर्धाच होणार आहे. केंद्र सरकारने २०२० मध्ये घोषित केलेल्या नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी आता हळूहळू सुरू होत आहे.
धोरणानुसार देशभरात सारखीच शिक्षणपद्धती राबविण्यासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यात आला आहे. ६२८ पानांच्या या आराखड्यात विद्यार्थी-शिक्षकांसाठी विशेष तरतुदी आहेत. सोशल मीडियातील मजकुराचे सुरक्षित आणि उपयुक्त वाचन कसे करावे, यासाठी अभ्यासक्रम आराखड्यात ‘बायलिसी’ ही संकल्पना मांडण्यात आली आहे. त्यासोबतच डिजिटल रायटिंग शिकविण्यासाठी विद्यार्थ्यांना ई-मेल, ब्लॉग तसेच पोस्ट लिहिण्याबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यासाठी शिक्षकांनी चांगले ब्लॉग, ई-मेल, पोस्ट विद्यार्थ्यांना दाखवाव्यात, अशीही सूचना आराखड्यात आहे.
क्यूआर कोडचा होणार वापर
अध्ययन, अध्यापन, अभ्यासक्रमाबाबतचा नवा दृष्टिकोन असे स्वतंत्र चॅप्टर देण्यात आले आहे. प्रत्येक वर्गाच्या प्रत्येक पुस्तकात धडा संपल्यानंतर एका पानावर शिक्षकांसाठी सूचना तसेच नोंदी दिलेल्या असतात. परंतु, या नोंदींमुळे पुस्तकाचा आकार अनावश्यकरीत्या वाढतो. या नोंदी वगळण्यात येऊन पुस्तकाचा आकार जवळपास अर्धा होण्याची शक्यता आहे. प्रत्येक पुस्तकाच्या दोन आवृत्त्या पुढच्या वर्षीपासून पाठ्यपुस्तके दोन स्वरूपांत छापली जातील. एक आवृत्ती विद्यार्थ्यांसाठी (टेक्स्ट बुक), दुसरी शिक्षकांसाठी (टेक्स्ट बुक प्लस) असेल. शिक्षक आवृत्तीमध्ये प्रत्येक धड्यानंतर सूचना, नोंदी, क्यूआर कोड असणार आहे.