पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुलांना शाळेत जाताना तप्तराचे ओझे होऊ नये म्हणून सरकारने वेगवेगळ्या उपाययोजना केल्या. आता तर पहिली ते आठवी फक्त एकच पुस्तक घेऊन शाळेत जावे लागेल, असेही बोलले जात आहे. पण सरकारने विद्यार्थ्यांचे टेंशन कमी करून शिक्षकांचे टेंशन वाढवले आहे.
इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पानेही दिली जाणार आहेत. या पानांवर ‘माझी नोंद’ या शिर्षकाखाली विद्यार्थ्यांना विविध बाबी लिहून ठेवायच्या आहेत. त्यासंदर्भातील सूचना शिक्षण विभागाने दिलेल्या आहेत. पण, गंमत म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा तपशील कळेलच असे नाही, त्यामुळे शिक्षकांना त्यात लक्ष घालावे लागणार आहे.
शिवाय शिक्षण विभागाने ज्या काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत, त्यात विद्यार्थ्यांच्या नोंदी सारख्या असू नयेत, याची काळजी घेण्यास शिक्षकांना सांगितले आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे व्यक्तिगत लक्ष देण्याची सवय तुटलेल्या शिक्षकांना याचा चांगलाच त्रास होणार आहे. पाठ्यपुस्तकांबाहेरील परंतु आशयाला पूरक माहितीची नोंद घेणे, काही संदर्भ, वर्तमानपत्रांत विषयांच्या अनुषंगाने आलेली विविध प्रकारची माहिती, साहित्यांची नोंद घेणे, चित्राकृती, चित्र, आलेख, आकृत्या काढण्यासाठी.
पाठाला पूरक मुद्दे लिहून ठेवणे आदी सूचना याबाबत देण्यात आल्या आहेत. हे सारे ‘माझी नोंद’ या शिर्षकाखाली तारखेनुसार लिहून ठेवायचे आहे, असेही शिक्षण विभागाने म्हटले आहे. स्वतः अभ्यास करायला बसतील, तेव्हा विद्यार्थ्यांना या नोंदींचा फायदा होईल, असे विभागाला वाटते. स्वतःचे संदर्भ तयार होतील, नोंद केलेल्या गोष्टी लक्षात राहतील, अवांतर वाचनातून तयार झालेल्या महत्त्वाच्या नोंदी घेता येतील, परीक्षांच्या तयारीसाठी अभ्यास करणे सोपे जाईल… असा या मागचा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.
‘माझी नोंद’मध्ये हे सुद्धा असेल
पाठ्यपुस्तकांमध्ये दिलेल्या वह्यांच्या पानांवर विद्यार्थी विविध संदर्भ नोंदवतील, तेव्हा त्यांना वेगवेगळ्या अंगाने फायदा होणार आहे. गणीत सोडविण्याची वेगळी रीत मांडणे, पाढे तयार करणे, म्हणी, वाक्प्रचार लक्षात ठेवणे, सुविचार, सुभाषिते, शब्दार्थ आदींची नोंद लक्षात ठेवणे सुद्धा विद्यार्थ्यांना सोपे जाणार आहे.
Education School New Textbook Blank Pages