नाशिक – तब्बल ८ लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणानंतर फरार असलेल्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर-वीर यांनी आता अटक टाळण्यासाठी धावाधाव सुरू केली आहे. यासाठीच त्यांनी अकटपूर्व जामीनासाठी नाशिक न्यायालयात अर्ज केला आहे. झनकर-वीर यांच्या वतीने अॅड अविनाश भिडे यांनी नाशिक न्यायालयात अर्ज सादर केला आहे. या अर्जावर जिल्हा न्यायालयात न्यायमूर्ती एम एच शेख यांच्या समोर आज (१३ ऑगस्ट) सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
शिक्षणाधिकारी वैशाली झनकर-वीर या सध्या फरार आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व पोलिसांचे पथक त्यांच्या मागावर आहे. आठ लाख रुपयांची लाच घेताना त्यांच्यासह त्यांचा वाहन चालक आणि प्राथमिक शिक्षक हे रंगेहाथ पकडले गेले. त्यानंतर जवळपास ९ तासांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. मात्र, झनकर-वीर यांनी पोलिसांना गुंगारा दिला. त्या न्यायालयात हजर झाल्या नाहीत. तर अन्य दोन आरोपी हजर झाले. त्यांना न्यायालयाने पोलिस कोठडी दिली आहे. झनकर-वीर या फरार असताना आता त्यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि अटक टाळण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.