नाशिक – लाचप्रकरणात अटक केलेल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर – वीर यांच्या अडचणीत दिवसागणीक वाढ होत आहे. न्यायालयीन कोठडी मिळूनही त्यांचा अतरिम जामिन फेटाळण्यात आल्याने जिल्हा रूग्णालयातील त्यांचा मुक्काम वाढला आहे. बुधवारी (दि.१८) पुन्हा जिल्हा न्यायालयात त्यांच्या नियमीत जामिन अर्जावर सुनावणी होणार आहे.
जिह्यातील एका शिक्षण संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या २० टक्के अनुदानाप्रमाणे नियमीत वेतन सुरू करण्याच्या मोबदल्यात आठ लाख रूपयांची लाच स्विकारलेल्या प्रकरणात शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर – वीर यांना ठाणे एसीबी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. सलग चार दिवसांच्या पोलीस कोठडी नंतर मंगळवारी (दि.१७) कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली.
आरोपीच्या वतीने नियमीत जामिन अर्ज सादर करण्यात आला. या कामकाजासाठी सरकारपक्षाच्या वतीने एक दिवसांची मुदत मागण्यात आली. ठाणे एसीबीची कारवाई असल्याचे कारण दाखविण्यात आले असता संबधीतांनी अंतरिम जामिन अर्ज सादर केला. या अर्जावर तब्बल चाळीस मिनीटे युक्तीवाद चालला. आरोपीच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे अनेक दाखले देण्यात आले तर सरकारपक्षाच्या वतीने त्यास विरोध दर्शविण्यात आला.
चौकशी दरम्यान पसार झाल्याचा मुद्दा सरकारपक्षाच्या वतीने लावून धरण्यात आला. त्यामुळे न्यायालयाने त्यांचा अंतरिम जामिन अर्ज फेटाळून लावला. बुधवारी त्यांच्या नियमीत जामिन अर्जावर सुनावणी होणार आहे. या सुनावणी दरम्यान झनकर यांना प्रकृर्ती अस्वस्थामुळे पुन्हा जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे