नाशिक – तब्बल ८ लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटकेत असलेल्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर-झनकर यांना दोनदा पोलिस कोठडी सुनावण्यात आली असली तरी त्यांची चौकशी होऊ शकलेली नाही. यापूर्वी त्यांना एक दिवसाची आणि त्यानंतर दोन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. मात्र, त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. परिणामी, पोलिसांना त्यांची कुठलीही चौकशी करता आलेली नाही. अखेर त्यांची पोलिस कोठडी आज संपत असल्याने नाशिक पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले. लाच प्रकरमी कुठलीही चौकशी होऊ शकली नसल्याने पोलिस कोठडी वाढवून मिळण्याची मागणी सरकारी वकिलांनी न्यायालयाकडे केली. याप्रकरणी चौकशी होणे अगत्याचे असल्याने न्यायालयाने डॉ. वैशाली वीर-झनकर यांच्या कोठडीत एक दिवसाची वाढ केली आहे. त्यामुळे आज त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी होण्याची अपेक्षा आहे. त्यांना उद्या (१७ ऑगस्ट) पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.
काय आहे प्रकरण
डॉ. वैशाली वीर-झनकर या नाशिक जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी आहेत. एका शैक्षणिक संस्थेचे प्रकरण मंजूर करण्यासाठी त्यांनी ९ लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडी अंती आठ लाख रुपयांची रक्कम घेण्याचे निश्चित झाले. त्यानंतर याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)कडे तक्रार देण्यात आली. त्याची दखल घेत एसीबीने सापळा रचला. या सापळ्यात डॉ. वैशाली वीर-झनकर यांच्यासह त्यांचा वाहन चालक आणि प्राथमिक शिक्षक हे रंगेहाथ सापडले. त्यानंतर तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच, चालक आणि शिक्षकाला कोठडी सुनावण्यात आली. त्यांची चौकशी झाली आहे. तर, डॉ. वैशाली वीर-झनकर या फरार झाल्या होत्या. त्यानंतर त्या एसीबीपुढे हजर झाल्या. आता त्याही पोलिस कोठडीत आहेत.