मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील सेवानिवृत्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची थकबाकी देण्यासाठी सुधारित अंदाजपत्रकात मागणी केली असून निधीच्या उपलब्धतेनुसार ही थकबाकी देण्यात येईल, असे शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत सांगितले.
विधानसभा सदस्य सुनिल राणे, विजयकुमार देशमुख यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना शिक्षणमंत्री प्रा. गायकवाड म्हणाल्या की, राज्यात १ लाख ७२ हजार १९७ पैकी १ लाख ३९ हजार ६६ सेवानिवृत्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकाच्या थकबाकीचा पहिला हप्ता दिला असून ३३ हजार १३१ सेवानिवृत्तांना ही थकबाकी देणे बाकी आहे. आतापर्यंत १ हजार ६६३ कोटी रुपयांपैकी ९११ कोटी रुपये वितरित करण्यात आले असून नागपूर वगळता सर्व जिल्ह्यातील माध्यमिक शाळांना पहिला हप्ता देण्यात आला आहे. १२ जिल्ह्यांतील जिल्हा परिषदेच्या शाळांना पूर्णतः तर २३ जिल्ह्यात अंशतः ही थकबाकी देण्यात आली असून राज्यातील सर्व खाजगी शाळांमध्ये ही पहिल्या हप्त्याची थकबाकी देण्यात आली आहे. उर्वरित दुसरा हप्ता आणि पहिल्या हप्त्यातील बाकी असलेल्यांच्या थकबाकीसाठी सुधारित अंदाजपत्रकात २ हजार कोटींची मागणी केली असल्याचे सांगून सोलापूर जिल्ह्यातील ८ हजार ७७६ सेवानिवृत्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना थकबाकीचा पहिला व दुसरा हप्ता देण्यात आल्याचेही शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी सांगितले.