शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ‘‘लोणी जिल्हा परिषद शाळेची बीओटी तत्त्वावर सुंदर इमारत उभारण्यात आली आहे. लोणी जिल्हा परिषद शाळेचे हे बीओटी मॉडेल राज्यभर राबविण्यात येईल.’’ अशी घोषणा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री, मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केली.
लोणी बु.येथे बीओटी तत्त्वावर बांधण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इमारतीचे व पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून बांधण्यात आलेल्या व्यापारी संकुल इमारतीचे लोकार्पण शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील होते. यावेळी खासदार डॉ.सुजय विखे-पाटील, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ.राजेंद्र विखे-पाटील, अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अण्णासाहेब म्हस्के-पाटील, ह.भ.प उद्धव महाराज मंडलिक, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे-पाटील, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आदी उपस्थित होते.
शालेय शिक्षणमंत्री श्री. केसरकर म्हणाले की, ‘‘परदेशासारखे शिक्षण ग्रामीण भागातील मुलांना मिळाले पाहिजे, यासाठी स्वर्गीय पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे-पाटील व स्वर्गीय पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे-पाटील यांनी सहकाराबरोबर शिक्षण क्षेत्रात काम केले. तंत्रज्ञानातील शिक्षण ग्रामीण भागातील मुलांना मिळावे; यासाठी बाळासाहेब विखे पाटील यांनी राज्यातील पहिले खासगी आयटीआयची मुहूर्तमेढ लोणी येथे रोवली. यातून त्यांची शिक्षणविषयक दूरदृष्टी दिसून येते.’’
‘‘विद्यार्थ्यांना शेतीचे ज्ञान व कौशल्य प्राप्त व्हावे. यासाठी पुढील शैक्षणिक वर्षापासून कृषी हा विषय इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यात येणार आहे. शालेय शिक्षणाचा पाया मजबूत करण्याचे काम जिल्हा परिषद शाळा करत असतात. लोणी येथे ‘बांधा,वापरा व हस्तांतरित करा’ (बीओटी) या तत्वावर बांधण्यात आलेली जिल्हा परिषद शाळा राज्यासाठी आदर्शवत असल्याचे’’ गौरवोद्गार श्री.केसरकर यांनी यावेळी काढले.
श्री.केसरकर म्हणाले, ‘‘शिक्षण विषयक नुसत्या संकल्पना मांडून चालत नाहीत तर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची गरज असते. जगाचे नेतृत्व करण्याची संधी भारताला आली आहे. अशा काळात ग्रामीण मुलांचे भविष्य घडविणे, त्यांना तंत्रज्ञान कुशल करण्याची जबाबदारी शासन व जनता म्हणून आपल्या सर्वांची आहे.’’
आपल्या प्रस्ताविकपर भाषणात महसूलमंत्री श्री.विखे-पाटील म्हणाले, ‘‘लोणी परिसरात अध्यात्मिक वारसा जोपासण्याचे काम पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी केले. ग्रामीण शिक्षण, सहकार, कृषी व आरोग्याचा पाया मजबूत करण्याचे काम त्यांनी केले.’’
सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांचा ४३ वा स्मृतीदिन आणि लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांचा ९१ व्या जयंती दिनाचे औचित्य साधून लोणी बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेल्या अखड हरिणाम सप्ताहाची सांगता आणि अभिवादन सोहळा शालेय शिक्षमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. आण्णासाहेब म्हस्के पाटील, खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले.
Education Minister on Agriculture Subject School Syllabus