मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ज्या शाळांत शिक्षकांची पदे रिक्त आहेत व काही ठिकाणी अतिरिक्त शिक्षक आहेत त्यांचे समायोजन महिन्याभरात केले जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत दिली.
यवतमाळ जिल्ह्यातील वणी पंचायत समिती अंतर्गत शिक्षकांच्या नियमबाह्य समायोजनाबाबत विधानसभा सदस्य संजीव रेड्डी बोदरकुवार यांनी प्रश्न उपस्थित केला होता. याला उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या,समायोजन करण्यासाठी 2017 च्या शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करण्यात येतो. तसेच ज्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या जास्त आहे तिथे शिक्षकांची आवश्यकता असल्याने स्थानिक प्रशासनाकडून विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन शिक्षक पाठविण्याचा निर्णय घेतला जातो.तसेच काही सदस्यांच्या याबद्दल तक्रारी असतील तर त्या तपासून घेऊ समायोजन करताना कोणत्याही प्रकारे नियमांचे उल्लंघन केले जाणार नाही याची खबरदारी घेण्यात येईल, असेही मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
राज्यातील शासनाच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार
मुंबई – राज्यात शाळांमध्ये अनुचित घटना घडू नयेत यासाठी जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत दिली.
राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनांना आळा बसण्यासाठी शासन करीत असलेल्या उपाययोजनांबाबत विधानसभा सदस्य संग्राम थोपटे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत विधानसभा सदस्य जयकुमार गोरे, देवयानी फरांदे यांनी भाग घेतला. या प्रश्नाला उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने ०७ एप्रिल २०१६ च्या शासन परिपत्रकान्वये सर्व शाळांना दिलेल्या आहेत. शासनाच्या जिल्हा परिषदेच्या व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्येही सीसीटीव्ही बसविण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत राज्यातील ६५६८६ शाळांपैकी १६२४ शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविलेले आहेत उर्वरीत सीसीटीव्ही लवकरात लवकर बसवावे यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे अशी माहिती, मंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत दिली.