मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षांचे निकाल आज जाहीर झाले आहेत. राज्यात एकूण 91.25 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून परीक्षेतील सर्व उत्तीर्ण विद्यार्थी, त्यांचे पालक व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी अभिनंदन केले आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन उत्तीर्ण न होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांनी नाउमेद न होता पुरवणी परीक्षेस प्रविष्ट होऊन यश संपादन करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या
बारावीच्या परीक्षेत नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 14 लाख 28 हजार 194 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14 लाख 16 हजार 371 विद्यार्थी प्रविष्ठ झाले असून 12 लाख 92 हजार 468 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालाची ही टक्केवारी 91.25 अशी आहे. तर पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 44.33 अशी आहे. नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 6113 दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 6072 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यातील 5673 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांच्या निकालाची टक्केवारी 93.43 इतकी आहे, अशी माहिती शिक्षण मंडळामार्फत देण्यात आली आहे.
उत्तीर्ण होण्यामध्ये मुलींची आघाडी
सर्व विभागीय मंडळातून नियमित उत्तीर्ण मुलींचा निकाल ९३.७३ टक्के असून मुलांचा निकाल 89.14 टक्के आहे. मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा 4.59 टक्क्यांनी जास्त आहे.
शाखानिहाय निकाल
इयत्ता बारावीच्या विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी 96.09, कला शाखेतील विद्यार्थ्यांची टक्केवारी 84.05, वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांची टक्केवारी 90.42 तर व्यवसाय अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 89.25 इतकी आहे. तर एकूण 154 विषयांपैकी 23 विषयांचा निकाल 100 टक्के आहे.
विभागीय मंडळनिहाय उत्तीर्ण विद्यार्थी
राज्यातील सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजेच 96.01 टक्के इतका असून मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 88.13 टक्के इतका आहे. या व्यतिरिक्त पुणे विभागात 93.34, नागपूर विभागात 90.35, औरंगाबाद विभागात ९१.८५, कोल्हापूर विभागात ९३.२८, अमरावती विभागात 92.75, नाशिक विभागात ९१.६६ आणि लातूर विभागात 90.37 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती मंडळामार्फत देण्यात आली आहे.
Education minister kesarkar on hsc result