विशेष प्रतिनिधी, मुंबई
इयत्ता १०वी व १२वीच्या परीक्षेबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अत्यंत महत्त्वाची माहिती रविवारी दिली आहे. १०वीची परीक्षा राज्य सरकारने रद्द केली आहे. त्याला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. त्याच्या सुनावणीत न्यायालयाने राज्य सरकारच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात प्रथमच मंत्री गायकवाड यांनी प्रतिक्रीया दिली आहे. त्या म्हणाल्या की, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि आरोग्य यास राज्य सरकार प्राधान्य देत आहे. म्हणूनच दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाची गंभीर स्थिती आणि विद्यार्थ्यांची सुरक्षितता याबाबत आम्ही न्यायालयात योग्य ती बाजू मांडू, सत्यस्थिती कथन करु, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. इयत्ता १२वीच्या परीक्षेबाबत आज बैठक झाली. त्यानंतर गायकवाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही सर्व माहिती दिली आहे. इयत्ता १०वी आणि १२वीच्या परीक्षेसंदर्भात येत्या २ दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.