नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विधानावरुन अंधश्रद्धा निर्मुलन समिती आक्रमक झाली आहे. केसरकर यांचे वादग्रस्त विधान हे सर्वत्र अंधश्रद्धा पोहचविणारे आहे. शिक्षण मंत्र्याने अशा प्रकारे विधान करणे चुकीचे आहे, असे अंनिसने म्हटले आहे.
अंनिसने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दिपक केसरकर यांनी दोन दिवसांपूर्वी नाशिक येथील पत्रकार परिषदेत सांगितले की, कोल्हापूर येथील पूर परिस्थितीच्या वेळी ते शिर्डीत होते. तेथे त्यांनी प्रार्थना केली. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाचे दरवाजे उघडले तरीही , पुराच्या पाण्याची पातळी वाढली नाही. ऐरवी धरणाचे दरवाजे उघडले तर पाण्याची पातळी दोन फूट किंवा त्यापेक्षा जास्त वाढते. मात्र केवळ ते शिर्डीत असल्याने धरणाचे दरवाजे उघडले तरीही पाण्याची पातळी वाढली नाही आणि त्यामुळे गावे पाण्याखाली गेली नाहीत. पुढे ते असंही म्हणाले की याला अंधश्रद्धा म्हणा, श्रद्धा म्हणा किंवा काहीही म्हणा पण जे घडले ते सर्वांनी पाहिले. असा अजब आणि चमत्कारसदृश्य दावा केसरकर यांनी केला.
खरं तर, शालेय शिक्षण मंत्री या अतिशय जबाबदारीच्या संवैधानिक पदावर आरूढ असलेल्या व्यक्तीने असा अवैज्ञानिक,भंपक दावा करणे हे पूर्णतः चुकीचे आहे. शिवाय राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या मूलभूत गाभाघटकात अंतर्भाव असलेल्या तसेच मूल्य शिक्षणातही ज्याचा जाणिवपूर्वक समाविष्ट करण्यात आलेला आहे आणि भारतीय राज्यघटनेमध्ये ५१ क मध्ये शोधक बुद्धी, मानवतावाद आणि वैज्ञानिक दृष्टीकोन याचा अंगिकार, प्रचार आणि प्रसार करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे मूलभूत कर्तव्य सांगितलेले आहे,
अशा वैज्ञानिक दृष्टिकोन ह्या मूल्याशी मंत्री महोदयांचे विधान पूर्णपणे विसंगत व आक्षेपार्ह आहे. म्हणून मंत्री महोदयांनी त्यांचे हे अवैज्ञानिक विधान मागे घेत असल्याचे जाहीर करून दिलगिरी व्यक्त करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंनिसच्या वतीने पत्राद्वारे त्यांच्याकडे करण्यात येत असल्याचे अंनिसचे राज्य प्रधान सचिव डाॅ टि.आर. गोराणे व राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी कळविले आहे.
education minister deepak kesarkar statement anis shirdi kolhapur superstition