मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – डी. फार्मसी कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक वृत समोर आले आहे. या संदर्भात महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने तसे परिपत्रक देखील जारी केले आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांना लाभ होणार असून विद्यार्थ्यांचे एका वर्षाचे शैक्षणिक नुकसान टाळता येणार आहे.
‘कॅरी ऑन’चा लाभ
आता फार्मसी पदविकेच्या प्रथम वर्षाच्या अनुतीर्ण विद्यार्थ्यांना ‘कॅरी ऑन’चा लाभ देत थेट दुसऱ्या वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्याला फार्मसी कॉन्सिल ऑफ इंडियाने मान्यता दिली आहे. महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने यासंदर्भात एक परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी आणि पालकांना या संदर्भात मोठी चिंता लागली होती परंतु आता या निर्णयामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. फार्मसी पदविकेच्या उन्हाळी परीक्षेच्या प्रथम वर्षाचा निकाल अत्यंत कमी लागल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालक चिंतेत होते.
अजित पवारांचा पाठपुरावा
या प्रश्नी लक्ष घालून काही तरी सकारात्मक तोडगा काढण्याची विनंती राज्यातील फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. या प्रश्नी विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी तातडीने कार्यवाही करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फार्मसी कॉन्सिल ऑफ इंडियाच्या कार्यालयाकडे या विषयी पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून फार्मसी पदविकेच्या प्रथम वर्षाच्या अनुतीर्ण विद्यार्थ्यांना कॅरी ऑनचा लाभ देत थेट दुसऱ्या वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्याला फार्मसी कॉन्सिल ऑफ इंडियाने मान्यता दिली आहे. या निर्णयाचा राज्यामधील हजारो फार्मसीच्या विद्यार्थ्याना लाभ होणार आहे.
निकालावर परिणाम
फार्मसी डिप्लोमामध्ये फार्मा उद्योगातील रसायनशास्त्राचा वापर, बायोकेमिस्ट्रीच्या सैद्धांतिक आणि व्यावहारिक संकल्पना, फार्माकोलॉजी आणि टॉक्सिकॉलॉजी यासह मूलभूत फार्मसी शिक्षण समाविष्ट आहे. हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना विविध रासायनिक क्षारांचा, त्यांचा उपयोग आणि औषधातील वापराविषयी अभ्यास करण्यास सक्षम करतो. फार्मास्युटिकल उद्योगात या अभ्यासक्रमाला खूप महत्त्व आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गत वर्षी फार्मसीच्या प्रवेश प्रक्रीयेला झालेल्या विलंबामुळे शैक्षणिक कालावधी अत्यंत कमी मिळाला होता. फार्मसी पदविका अभ्यासक्रम हा वार्षिक असून फार्मसी कॉन्सिल ऑफ इंडीयाच्या धोरणानुसार हा कालावधी किमान १८० दिवसांचा असणे अपेक्षित होते. मात्र गेल्या वर्षी हा कालावधी अवघा तीन ते चार महिने म्हणजे केवळ १०० ते १२० दिवस एवढाच मिळाला होता. याचा थेट परिणाम प्रथम वर्षाच्या निकालावर झाला होता.
नैराश्य वाढण्याची भीती
बी. फार्मसी हा चार वर्षांचा तर डी. फार्मसी हा दोन वर्षांचा अभ्यासक्रम आहे. डी. फार्मसी म्हणजे डिप्लोमा इन फार्मसी होय. हा अभ्यासक्रम एकूण चार सत्रांमध्ये विभागलेला असतो .फार्मसीच्या पदविकेच्या उन्हाळी परीक्षा २०२३ चा निकाल ५० टक्याहून कमी लागला. त्यामुळे विद्यार्थ्यांच्यावर अतिरिक्त ताण येऊन त्यांच्यात नैराश्य वाढण्याची भीती होती. त्यामुळे या प्रश्नी काही तरी सकारात्मक तोडगा काढण्यासाठी फार्मसीच्या सर्व महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदनाद्वारे साकडे घातले होते. प्रश्नाचे गांभीर्य आणि विद्यार्थ्याचे हित लक्षात घेऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांनी फार्मसी कॉन्सिल ऑफ इंडियाच्या नवी दिल्लीच्या कार्यालयासोबत पाठपुरावा केला होता.