मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य सरकारने शालेय परीक्षांबाबत अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या संकटामुळे ऑनलाईन शिक्षणानंतर आता ऑफलाईन शिक्षण सुरू झाले आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाचा विचार करुन राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, एप्रिल महिन्यात शाळा सुरू राहणार आहेत. १०० टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा या ऑफलाईन पद्धतीने एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात किंवा मे च्या पहिल्या आठवड्यात होण्याची चिन्हे आहेत.
कोरोनाच्या संसर्गामुळे शिक्षणावर मोठा परिणाम झाला. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू करण्यात आले. मात्र, ग्रामीण आणि दुर्गम भागात मोबाईल नेटवर्कसह अनेक अडचणी होत्या. अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेता आले नाही. त्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले. मात्र, गेल्या महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने ऑफलाईन पद्धतीने शिक्षण सुरू करण्यात आले आहे. आता तर कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असल्याने विद्यार्थ्यांच्या १०० टक्के उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता त्यांचे शैक्षणिक नुकसान भरुन काढण्यासाठी संपूर्ण एप्रिल महिन्यात शाळा सुरू ठेवण्याला हिरवा कंदिल देण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना गेल्या काही काळातील अनेक संज्ञा आणि अभ्यास पूर्ण करता येणार आहेत. त्यामुळेच दरवर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या वार्षिक परीक्षा यंदा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे च्या पहिल्या आठवड्यात होणार आहेत. तसेच, एप्रिल महिन्यात शनिवारी दिली जाणारी अर्धवेळची सुटीही रद्द करण्यात आली आहे. तसेच, आवश्यकता भासल्यास रविवारीही वर्ग भरविण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे. म्हणजेच, एप्रिल महिना हा विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे अभ्यासाचा राहणार आहे. तर, उन्हाळी सुट्या या मेच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापासून मिळू शकणार आहेत.