नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्ह्यामध्ये भेसळयुक्त तेल विक्रीचा भांडाफोड झाला आहे. नाशुक-पुणे रोडवरील शिंदे येथील नायगाव रोडवर अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) ही कारवाई केली आहे. माधुरी फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यावर एफडीएने छापा टाकून तब्बल १ कोटी १० लाख ११ हजार २८० रुपयांचा खाद्यतेल साठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.
अन्नसुरक्षा अधिकारी गोपाल कासार यांनी विशेष मोहिम अंतर्गत अन्नसुरक्षा अधिकारी अमित रासकर, अविनाश दाभाडे अन्नसुरक्षा अधिकारी यांचे समवेत शिंदे गाव येथे ही धाड टाकली. यावेळी विक्री होणाऱ्या विविध प्रकारच्या सात खाद्य तेलाचे नमुने घेऊन उर्वरित साठा १ कोटी १० लाख ११ हजार २८० रुपयांचा खाद्यतेलाचा साठा जप्त करण्यात आला. लेबल दोष व भ्रामक जाहिरात असल्याच्या कारणावरून तसेच अन्न पदार्थ अप्रमाणित असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली. खाद्यतेल फोर्टीफाईड नसल्याची दाट शक्यता असल्याने खाद्यतेलाचे सात नमुने घेण्यात आले आहे. अन्न सुरक्षा विभागाचे सह आयुक्त, नाशिक विभाग गणेश परळीकर व सहाय्यक आयुक्त( अन्न) परिमंडळ ४ चे विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
अन्न सुरक्षा सप्ताहतंर्गत अन्न व औषध प्रशासनामार्फत नागरिकांमध्ये जनजागृती करुन खाद्यतेलाचे नमुने तपासले जात आहेत. दिल्ली येथील अन्नसुरक्षा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात नामांकित ब्रँडसह अन्य खाद्यतेलाचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेऊन प्रयोगशाळेत पाठविण्यात येत आहेत. याच मोहिमेच्या वेळी ही कारवाई करण्यात आली.