मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सणासुदीच्या काळात महागाई वाढते, विशेषतः खाद्यतेलाचे भाव कडाडतात, असा सर्वसामान्यपणे दरवर्षीचा अनुभव आहे यंदा मात्र खाद्यतेलाच्या बाबतीत काहीसा दिलासा मिळालेला दिसतो कारण खाद्यतेलाच्या किमती गेल्या दोन-तीन वर्षात खूपच कडाडल्या होत्या. आता मात्र या किमती सातत्याने कमी होत असून यात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. विशेषतः केंद्र सरकारच्या खाद्यतेला बाबतच्या धोरणामुळे तसेच जागतिक बाजारपेठेतील उलाढाल याचा हा परिणाम दिसून येतो, असे सांगण्यात येते. त्यामुळे चिंतेत असलेल्या सर्वसामान्यांसाठी दिलासा मिळणार आहे.
गेल्या आठवड्यापासून जागतिक बाजारातील तेजीमुळे देशातील तेल-तेलबिया बाजारात सुधारणा दिसून आली. भुईमूग आणि सोयाबीनचे भाव खाली आले आहेत. ज्याचा परिणाम तेल बाजारावर झाला आहे. या तेलाच्या घसरणीनंतर मोहरी, भुईमूग, सोयाबीन, कच्चे पामतेल, पामोलिनचे भाव खाली आले आहेत. तेलाच्या किमती सरकारच्या हस्तक्षेपानंतर गेल्या काही दिवसात कमी झाल्या आहेत. मात्र पुन्हा एकदा किमती कमी झाल्यास सर्वसामन्यांना आणखी दिलासा मिळू शकतो. वास्तविक रशिया युक्रेन युद्धामुळे जगभरात खाद्यतेलाच्या किमती वाढल्या आहेत. भारतीय शेतकरी याला एक मोठी संधी मानत असून, त्यांनी मोठ्या प्रमाणात सूर्यफूल, एरंडेलसह इतर तेलबियांची लागवड केली आहे.
सध्या सणासुदीच्या काळात देशात खाद्यतेलाच्या किमती काही प्रमाणात उतरण्याची शक्यता आहे. त्यातच देशात यंदा सूर्यफुलाची लागवड १.७७ लाख हेक्टरवर करण्यात आली आहे. गेल्या वर्षी हीच लागवड १.४१ लाख हेक्टरवर करण्यात आली होती. म्हणजेच यंदा लागवड २५ टक्क्यांनी वाढली आहे. एरंडेलची लागवडही ६८ टक्क्यांनी वाढली आहे. तेलाची निर्यात वाढली असल्याने किमती काही प्रमाणात स्थिर झाल्या आहेत.
महत्वाची गोष्ट म्हणजे अर्जेंटिना देशातून तेलाचा पुरवठा वाढला आहे. रशियाकडेही तेलाचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. तसेच भारतातही सूर्यफुलाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली असल्याचा फायदा होत देशात तेलाच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. आपल्या देशात सर्वाधिक सूर्यफुलाची लागवड ही कर्नाटकमध्ये होते. या राज्यात शेतकऱ्यांनी १.५२ लाख हेक्टर क्षेत्रावर सूर्यफुलाची लागवड केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण ५० टक्के अधिक आहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांमध्येही सूर्यफुलाची लागवड जास्त प्रमाणात होते.
केंद्र सरकारने काल, गुरुवारी खाद्यतेल उत्पादक, पॅकेजिंग आणि आयातदारांना अनुचित व्यापार पद्धतींना आळा घालण्याच्या प्रयत्नात लेबलमध्ये तापमानाच्या ऐवजी शुद्धतेचे प्रमाण आणि वजनानुसार निव्वळ प्रमाण नमूद करण्याचे निर्देश दिले. यासाठी त्यांना पुढील वर्षाच्या १५ जानेवारी २०२३ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
आयात तेल स्वस्त झाल्यामुळे गेल्या आठवडाभरात तेलबियांचे दर कमालीचे खाली आले आहेत. पामोलिन तेलाच्या सध्याच्या किमतीपेक्षा 10 ते 12 रुपये किलोने स्वस्त होईल. कांडला बंदरात पामोलिनची सध्याची किंमत 114.50 रुपये प्रति किलो आहे. हाच भाव 101 ते 102 रुपये प्रतिकिलो राहण्याची शक्यता आहे. मात्र दरम्यान नाशिक आणि पुणे येथील बाजारपेठेत गणेशोत्सवाची लगबग सुरू असून खाद्यतेल व किराणा दुकानांवर गर्दी दिसून येत आहे, मात्र खाद्यतेलाचे भाव थोडेसे कमी झाले तरी अद्याप आणखी कमी होतील की नाही, असे ठोक आणि किरकोळ किराणा माल दुकानदारांनी सांगितले.
सध्या किरकोळ व्यापारी सुमारे 50 रुपये अधिक किमतीने तेल विकतात. तसं पाहिलं तर ही MRP वास्तविक खर्चापेक्षा 10 ते 15 रुपयांपेक्षा जास्त नसावी. सरकारसोबतच्या बैठकीत, किरकोळ व्यापार्यांनी एमआरपी कमी करण्यास सहमती दर्शवली आहे. 10 ते 15 रुपयांनी किमती कमी करण्यास व्यापाऱ्यांनी सहमती दर्शवली असे सांगण्यात येते परंतु याबाबत अद्याप स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये मत मतदान तळे आणि मतभेद दिसून येतात.
गेल्या आठवड्यात मोहरीचे भाव 75 रुपयांनी घसरून 7240 ते 7290 रुपये प्रति क्विंटलवर बंद झाले. मोहरी तेलाचा भाव 250 रुपयांनी घसरून 14,550 रुपये प्रति क्विंटल झाला. परंतु महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, जळगाव या शहराचा विचार करता या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यतेल वापरले जाते असे दिसून येते, मराठवाड्यातील काही भागात करडई आणि सूर्यफुलाचे तेल वापरले जाते. तर खानदेशात भुईमुगाच्या तेलाला मागणी असते, नाशिक व पुणे येथे सूर्यफूल तेलाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो, असे गृहिणींनी सांगितले. त्यामुळे प्रत्येक तेलाचा खप आणि पॅकेटची किंमत वेगवेगळी असल्याचे दिसून येते.
Edible Oil Rates Reduces Soon Festival Season