मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दरवर्षी सणासुदीचे दिवस आले की, महागाई वाढते त्यातच यंदा दिवाळीसारख्या मोठ्या सणाच्या तोंडावर खाद्यतेल व दाळींचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढ होते, मात्र दिवाळी सण होऊन सुमारे दोन आठवडे उलटल्यानंतरही खाद्यतेलाच्या किमतीत वाढ सुरूच आहे. खरे तर खाद्यतेलाचे भाव सण संपल्यानंतर कमी होतात. मात्र, यावेळी कच्च्या तेलाच्या दरवाढीचे कारण आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढलेले भाव आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा आर्थिक घटकात बसणार असून गृहींचे गृहिणींचे देखील बजेट कोलमडणार आहे.
खाद्यतेलाचे भाव वाढीचे कारण रशिया आणि युक्रेनमधील वाढता तणाव असल्याचे म्हटले जात आहे. कारण खाद्यतेलाचे दरही जागतिक परिस्थितीवर अवलंबून आहेत. मात्र, सणासुदीच्या काळात तेलाची मागणी वाढली होती. वास्तविक खाद्य तेलाच्या किंमती या सर्वसामान्यांच्या बजेटसाठी खूप महत्त्वाच्या असतात. एलपीजी सिलिंडर, पेट्रोल-डिझेलच्या भावाप्रमाणेच खाद्य तेलाच्या भावावरदेखील सर्वसामान्य लक्ष ठेवून असतात.
गेल्या काही महिन्यात खाद्य तेलाच्या किंमतीत चढउतार होत आहेत. तसेच सध्या परदेशातील बाजारातील घसरणीचा कल असला तरी लग्नसराई आणि हिवाळ्यातील वाढत्या मागणीमुळे आगामी काळात खाद्यतेलाच्या किंमतीच्या आघाडीवर सर्वसामान्यांना फटका बसण्याची चिन्हे आहेत. दिल्लीच्या बाजारात मोहरी, सोयाबीन तेल, तिळ तेलाच्या किंमतीत वाढ दिसून आली. दुसरीकडे, भुईमूगाच्या नवीन पिकाची बाजारपेठेत वाढती आवक आणि परदेशात निर्यातीची वाढती मागणी यामुळे तेल-तेलबिया आणि सीपीओ आणि पामोलिनचे भाव पूर्वीच्या पातळीवरच राहिले आहेत.
व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मलेशिया व शिकागो एक्सचेंज सुमारे दोन टक्क्यांनी घसरला आहे. आगामी काळात किरकोळ खाद्य तेलाच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र असे असूनही भारतीय बाजारपेठेत वाढलेली आवक आणि हिवाळी मागणी वाढल्यामुळे भुईमूग तेल-तेलबियांचे भाव पूर्वीच्या पातळीवरच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरणीचा फायदा त्यामुळे देशांतर्गत पातळीवर झालेला नाही.
पामोलिन तेलाच्या स्वस्त दरामुळे भारतासह परदेशातही पामतेलाची मागणी वाढल्याचे सांगितले जाते. त्यातच कोरोना महामारीनंतर आता सामूहिक कार्यक्रम, विवाहसोहळे मोठ्या धामधडक्यात साजरे होत आहेत. त्याचबरोबर हिवाळ्यात आणि निर्यात मागणी वाढल्याने बहुतांश खाद्यतेल-तेलबियांच्या भावात वाढ झाली आहे. या दरम्यान, हलक्या तेलांच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. सीपीओ आणि पामोलिन तेलाच्या किंमती जुन्याच पातळीवर आहेत. तसेच खाद्यतेल-तेलबियांच्या संदर्भात सरकारने स्टॉक धारण मर्यादा रद्द केला आहे.
सध्या लग्नसराई आणि हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत खाद्य तेलांची मागणी वाढणार आहे. परिणामी ही मागणी पूर्ण करण्यासाठी आयात वाढवणे आवश्यक आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देशातील खाद्यतेलाच्या किंमतींकडे सर्वसामान्य माणसाचे लक्ष असणार आहे. आधीच वाढलेल्या महागाईमुळे त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांच्या खिशावर खाद्यतेलाच्या किंमतींचा भार पडण्याची शक्यता आहे. येत्या काही महिन्यात तेलाची मागणी कायम वाढणार आहे. अशा परिस्थितीत तेलाच्या किमती वाढणे साहजिक आहे.
गेल्या महिनाभरात देशात खाद्यतेलाच्या किमती १५ ते ३० रुपयांनी वाढल्या आहेत. महिन्याभरात रिफाइंड सोयाबीन तेलाचा घाऊक भाव १२०-१२५ रुपयांवरून १४०-१४५ रुपये, मोहरीचे तेल १३०-१३५ रुपयांवरून १४५-१५० रुपये, सूर्यफूल तेल १३०-१३५ रुपयांवरून १६०-१६५ रुपये लिटर झाले. या दरम्यान आयात केलेल्या पामोलिन तेलाचे दर ९० ते ९५ रुपयांवरून १०५ ते ११० रुपये प्रति लिटर झाले असून आंतरराष्ट्रीय तेजीमुळे देशात खाद्यतेलाच्या किमतीही वाढल्या आहेत.
Edible Oil Rates Increase Inflation