अश्विनी कावळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्यांसाठी आणखी एक वाईट बातमी आहे. सध्याची परिस्थिती पाहता आगामी काळात खाद्यतेलाच्या किमती पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. इंडोनेशियाने घेतलेल्या एका निर्णयाचा मोठा परिणाम भारतीय बाजारपेठेवर होणार आहे. इंडोनेशियामध्ये देशांतर्गत टंचाई कमी करण्यासाठी आणि गगनाला भिडणाऱ्या किंमतींना आळा घालण्यासाठी खाद्यतेल आणि त्याच्या कच्च्या मालाच्या निर्यातीवर बंदी घालण्याची योजना आखण्यात आली आहे. तशी घोषणाच इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांनी केली असल्याने जगभरात तेलाच्या किंमती वाढणार आहे.
गेल्या काही महिन्यात जगभरात अनेक घटना अशा घडल्या ज्यामुळे महागाईचा भडका उडाला. रशिया – युक्रेन युद्ध तर मोठं कारण यामागे ठरलं. या देशांमधून तेलासाठी आवश्यक असलेला कच्चा माल भारतात येत असतो. पण युद्धाच्या परिस्थितीमुळे आयात – निर्यातीची प्रक्रियाच ठप्प झाली. याचा परिणाम म्हणजे आपल्याकडे तेलासाठीचा कच्चा माल येऊ शकला नाही आणि अर्थशास्त्राच्या नियमाप्रमाणे मागणी आणि पुरवठ्याचा ताळमेळ न बसल्याने किंमती वाढल्या. आता या किंमतींमध्ये अजूनच वाढ होण्याची शक्यता आहे. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो म्हणाले की, “देशातील खाद्यतेलाची उपलब्धता पुरेशा प्रमाणात आणि वाजवी किमतीत राखली जावी यासाठी मी या धोरणाच्या अंमलबजावणीचे निरीक्षण आणि मूल्यमापन करत राहीन.” हा निर्णय अशावेळी घेण्यात आला आहे, जेव्हा इंडोनेशियातील लोक खाद्यपदार्थांच्या महागाईविरोधात आंदोलन करत आहेत.
भारत हा इंडोनेशियाकडून तेल घेणारा जगातील सर्वात मोठा खरेदीदार देश आहे. अर्ध्याहून अधिक पामतेल आयातीसाठी सर्वोच्च उत्पादक इंडोनेशियावर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत इंडोनेशिया देशाने किंमती वाढवल्या तर त्याचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर होणार आहे. आधीच महागाईची झळ खिशाला चटका लावत असताना आता ही भर न सोसणारी असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत. दरम्यान, महागाई कमी करण्यासाठी काही दिवसांपूर्वीच केंद्रीय स्तरावर उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली होती. परंतु, अद्याप तरी त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आलेले नाही.