नवी दिल्ली – सणासुदीच्या काळात किरकोळ बाजारातील खाद्यतेलाच्या किमती कमी करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. खाद्यतेलाच्या साठ्याची मर्यादा निश्चित केल्यानंतर सरकारने पाम, सोया आणि सूर्यफूलाच्या कच्च्या तेलावरून बेसिक सीमा शुल्क घटविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने वरील तेलाच्या किंमती १५ रुपयांपर्यंत घटणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. त्याशिवाय सणासुदीच्या काळात तेलाचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी सप्टेंबरमध्ये विक्रमी आयात करण्यात आली आहे.
केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क बोर्डाच्या अधिसूचनेनुसार आयात शुल्क आणि उपकरातील ही कपात १४ ऑक्टोबरपासून ३१ मार्च २०२२ पर्यंत लागू असेल. खाद्यतेल संघटना एसईएने सांगितले, की सप्टेंबरमध्ये आयात ६३ टक्के वाढवून ती १६.९८ लाख टनपर्यंत पोहोचली आहे. आतापर्यंत कोणत्याही महिन्यात आयात करण्यात आलेल्या तेलापेक्षा अधिक आयात आहे. त्यामध्ये पामतेलाची विक्रमी आयात झाली आहे. यापूर्वी सर्वात जास्त खाद्यतेलाची आयात २०१५ मध्ये १६.५१ लाख टन करण्यात आली होती. केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या शुल्कात कपात करण्यासाठी गेल्या काही महिन्यांत चौथ्यांदा उत्पादन आणि सीमा शुल्कात कपात केली आहे. बुधवारी सेस आणि सीमा शुल्कात कपात केल्यानंतर शुद्ध पाम तेलाच्या किमती ८ ते ९ रुपये लिटर आणि सूर्यफूल, सोयाबीन तेलाच्या किमती १२ ते १५ रुपये लिटर कमी होणार आहेत.
एका वर्षातील तेलाच्या किमती
खाद्यतेल २०२० २०२१
सोया १०६ १५४.९५
मोहरी १२९.१९ १८४.४३
वनस्पती ९५.५ १३६.७४
सूर्यफूल १२२.८२ १७०.०९
पाम ९५.६८ १३२.०६
स्रोत – अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाची ९ ऑक्टोबरपर्यंतची आकडेवारी