विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोनाचा विषाणू असो की आणखी काही चीन हा विविध बाबींसाठी कारणीभूत असतो. पण, सध्या भडकलेल्या खाद्यतेलाच्या किंमतींनाही तोच जबाबदार असल्याची बाब समोर आली आहे. यावर तुमचा विश्वास बसत नाहीय मग हे वृत्त सविस्तर वाचा म्हणजे तुम्हाला नक्की खात्री पटेल.
भारत हा ७० टक्के खाद्य तेल हे परदेशातून आयात करतो. म्हणजेच, भारताचे हे अवलंबित्व फार मोठे आहे. परिणामी, आंतरराष्ट्रीय पातळीवर तेलाच्या दरावर परिणाम झाला ती त्याची थेट झळ भारताला पोहचते. भारतीय बाजारपेठेत खाद्य तेलाचे दर सध्या प्रति लिटर १७० ते १८० रुपयांवरून २०० रुपयांवर गेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे.
सेंट्रल ऑर्गनायझेशन फॉर ऑईल इंडस्ट्रीज अँड ट्रेडच्या मते, दरवर्षी भारत सुमारे २५ दशलक्ष लिटर खाद्यतेल वापरतो. देशांतर्गत उत्पादनातून, भारताला या आवश्यकतेपैकी केवळ ९० लाख लिटरची पूर्तता करता येणार आहे. उर्वरित १.४० किंवा १५ अब्ज लिटर खाद्यतेलसाठी भारताला अर्जेंटिना, कॅनडा, मलेशिया, ब्राझिल आणि इतर दक्षिण अमेरिकन देशांवर अवलंबून आहे. या आयातीसाठी भारत देखील भारी किंमत मोजत आहे.
भारताची खाद्य तेल आयात ही एकूण आयातीच्या अडीच टक्के आहे. चीनच्या अफाट लोकसंख्येसाठी खाद्यतेलाची गरज निरंतर वाढत आहे. तेथील खाद्यपदार्थात बदल केल्याने चीनमध्ये खाद्यतेलांचा वापरही वाढत आहे. सर्वसाधारणपणे, चिनी समाजात पूर्वी उकडलेले अन्न प्रामुख्याने होते, परंतु आता तळलेले पदार्थ आणि तेलातील अन्नपदार्थांचा वापरही वाढत आहे. ही गरज भागवण्यासाठी चीन हा आंतरराष्ट्रीय बाजारातून जास्त किंमतीला तेल विकत घेत आहे. वाढलेली मागणी आणि त्यापाठोपाठ चढ्या दराने खरेदीची चीनची चढाओढ यामुळे तेलाच्या आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमती वाढत आहेत.
भारतातही सातत्याने तेलाची मागणी वाढत आहे. २०१२ मध्ये भारतात प्रतिव्यक्ती १५ किलो तेलाची मागणी होती. जी तब्बल २० किलो पेक्षा अधिक झाली आहे. म्हणजेच वापरात २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तळलेल्या पदार्थांच्या निरंतर वाढीमुळे लोक विविध रोगांनी ग्रस्त आहेत. तरीही खाद्य तेलाची मागणी वाढतेच आहे.