मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले आहे. कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांची चौकशी होणार आहे. संजय राऊत हे सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. असे असताना आता त्यांच्या पत्नीचीही चौकशी होणार आहे.
कोर्टाने या प्रकरणात राऊतांच्या ईडी कोठडीत आजच वाढ केली आहे. संजय राऊत यांना ८ ऑगस्ट पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायालयात ही सुनावणी झाल्यानंतर काही तासांनी ईडीने हे समन्स जारी केले आहे. गोरेगाव उपनगरातील पत्रा चाळच्या पुनर्विकासात कथित आर्थिक अनियमितता केल्याप्रकरणी ईडीने राऊत यांना रविवारी अटक केली. या प्रकरणात संजय राऊत यांच्याशिवाय त्यांची पत्नी आणि काही कथित साथीदारांचाही सहभाग असल्याचे सांगण्यात येत आहे.
वर्षा राऊत यांच्या खात्यातील व्यवहार उघडकीस आल्यानंतर समन्स बजावण्यात आल्याचे ईडीने म्हटले आहे. कोर्टात गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान, ईडीने सांगितले की, वर्षा राऊत यांच्या खात्यात असंबंधित व्यक्तींकडून १.०८ कोटी रुपये मिळाले आहेत. या चौकशीचा भाग म्हणून ईडीने एप्रिलमध्ये राऊत यांची पत्नी वर्षा राऊत आणि त्यांच्या दोन साथीदारांची ११.१५ कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त केली होती.
ईडीने संजय राऊत यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. मुंबईतील चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पातील कथित अनियमिततेतून शिवसेनेचे खासदार आणि त्यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपये “गुन्ह्याची प्रक्रिया” म्हणून मिळाल्याचे ईडीने यापूर्वी न्यायालयाला सांगितले होते. दरम्यान, पती तुरुंगात आणि आता पत्नीची ईडीकडून चौकशी होणार आहे. या प्रकारामुळे शिवसेनेमध्ये संतापाचे वातावरण आहे.
ED Summons to Varsha Sanjay Raut Today
Enforcement Directorate Shivsena MP Sanjay Raut