नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ईडी, सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करण्यात येत असून विरोधकांवर राजकीय सुडबुद्धीने कारवाई होत असल्याचा आरोप विरोधीपक्षातील नेते करताहेत. विरोधकांच्या या टीकेवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘ओरडू नका, न्यायालयात जा’, असे म्हणत सडेतोड उत्तर दिले आहे.
काही दिवसांपूर्वीच देशभरातील विरोधीपक्षातील प्रमुख नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याची तक्रार केली होती. विशेषत: ईडी आणि सीबीआय दोन्ही तपास यंत्रणांचा वापर करून विरोधकांना राजकीयदृष्ट्या संपविण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याची ओरड होऊ लागली आहे. अशा घटना सातत्याने घडत असल्याचे चित्र महाराष्ट्रासह वेगवेगळ्या राज्यांमध्ये आहे. भाजपसोबत असलेल्या पक्षातील नेत्यांच्या भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष करत केवळ विरोधकांना टार्गेट करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांना कडक प्रत्युतर दिले आहे.
शहा म्हणाले,‘कोणत्याही तपास यंत्रणेने बजावलेल्या नोटीशीला तुम्ही न्यायालयात आव्हान देऊ शकता. तसेच, कोणत्याही एफआयआर आणि चार्जशीटलाही न्यायालयात आव्हान देता येते. त्यामुळे न्यायालयात जा, ओरडून काय फायदा होणार. आता जे ओरडत आहेत, त्यांच्यातील २ प्रकरण सोडून, बाकींच्या सर्व गुन्ह्यांची नोंद त्यांच्या काळात झाली आहे. अलीकडच्या वर्षात काहीही दाखल झालं नाही. यांनी १२ लाख कोटी रूपयांचे घोटाळे केले असून, सीबीआयमध्ये गुन्हा दाखल झाला होता. मग, न्यायालयात जाण्यासाठी यांना कोण थांबवत आहे. आमच्या पक्षात कमी आणि त्यांच्याकडे सर्वात जास्त चांगले वकील आहेत.
यंत्रणा स्वतंत्र पद्धतीने काम करतेय
काही विशिष्ट राजकारण्यांविरुद्ध कारवाई होत असल्याची टीका सातत्याने होत आहे. त्यावर उत्तर देताना गृहमंत्री शहा म्हणाले,‘जनता प्रत्येक गोष्ट पाहत आहे. तपास यंत्रणा स्वतंत्र पद्धतीने काम करत आहेत.’
https://twitter.com/AmitShah/status/1636953468572258304?s=20
ED CBI Action on Opposition Leader Amit Shah