इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – निलंबित आयएएस अधिकारी पूजा सिंघल, त्यांचे पती अभिषेक झा आणि चार्टर्ड अकाउंटंट सुमन कुमार यांच्या सर्व बँक खात्यांमधील व्यवहार बंद करण्यात आले आहेत. ६ मे रोजी, अंमलबजावणी संचालनालयाने (ED) देशातील पाच राज्यांमध्ये वीसहून अधिक ठिकाणी छापे टाकले. त्यात अनेक संशयित बाबी समोर आल्यानंतर सर्व बँक खाती गोठवण्यात आले आहेत. आता पुढील आदेश येईपर्यंत आयएएस सिंघल यांच्यासह त्यांच्या पती व सीएला कोणत्याही प्रकारचा बँक व्यवहार करता येणार नाही.
आयएएस अधिकारी पूजा सिंघल, त्यांचे पती अभिषेक झा आणि चार्टर्ड अकाउंटंट सुमन कुमार यांच्या बँक खात्यात बरीच रक्कम जमा झाल्याचं सांगण्यात येत आहे. कोर्टात हजेरी सुरू असताना, चार्टर्ड अकाउंटंट सुमन कुमार यांच्याकडून त्यांच्या धाकट्या भावाने काही कोऱ्या चेकवर सही घेतली होती. पण त्याआधीच सर्व खाती गोठवण्यात आल्याने या चेकद्वारे आर्थिक व्यवहार होणार नाही हे माहित असल्याने ईडीचे अधिकारी निर्धास्त होते. सुमन कुमारच्या भावाच्या या प्रयत्नामुळे ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यालाही फटकारले आहे.
निलंबित आयएएस पूजा सिंघल यांचा पती अभिषेक झा यांचे पल्स नावाचे हॉस्पिटल आहे. यावरदेखील अंमलबजावणी संचालनालयाने कारवाई केली आहे. या हॉस्पिटलकडून अनेकांना देणं आहे. आता ईडीच्या कारवाईमुळे आपले पैसे बुडतील की काय अशी भीती भांडवलदारांना वाटत आहे. यासाठी काहींनी कोर्टात जाण्याचेही ठरवले आहे. पल्स हॉस्पिटल व्यवस्थापनावर कोट्यवधी रुपयांचे कर्ज असल्याचे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत ईडीने पल्स हॉस्पिटल जप्त केल्यास ही थकबाकी कधीच लोकांना मिळू शकणार नाही, अशी भीती भांडवलदारांना वाटत आहे. काहींनी आपली थकबाकी मिळावी यासाठी वकिलांकडे धाव घेतली आहे. थकबाकी मिळाली नाही तर आम्ही उद्ध्वस्त होऊ, अशी विनंतीदेखील एका कंत्राटदाराने ईडीकडे केली आहे.
रांचीचे रहिवासी अभिनंदन सिंग यांनी पल्स हॉस्पिटलमध्ये इंटिरिअर डिझायनिंग आणि डेकोरेशनचे काम केले आहे. पण हॉस्पिटलचे मुख्य झा यांनी त्यांचे ९० लाख रुपये थरवले आहे. २०२०मध्येच त्यांनी कर्ज घेऊन सिंग यांनी हे काम पूर्ण केले होते. त्यांनी बिलही जमा केले, पण पूजा सिंघल आणि त्यांच्या पतीने त्यांना एक पैसाही दिला नाही. ईडीची कारवाई झाल्यापासून ते चिंतेत आहेत. आता त्यांची थकबाकी भरण्यासाठी कोर्टात जाण्याचा विचार आहे. दिल्लीचे रहिवासी सुबोध यादव यांनी पल्स हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनसाठी गॅस पाइपलाइनचे काम केले, त्याचे २५ लाख रुपये त्यांना अद्याप मिळालेले नाही. तसेच हॉस्पिटलमध्ये एसी बसवणाऱ्या अश्विनी गांढू यांचेही व्यवस्थापनाचे २५ लाख रुपये थकीत आहेत.