इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः महाराष्ट्रात आज विधानसभेचे मतदान पार पडत असताना बिटकॉइन घोटाळा समोर आला आहे. पुण्यातील माजी पोलिस अधिकारी रवींद्र पाटील यांनी निवडणुकीत परकीय चलन वापरल्याचा आणि आर्थिक व्यवहारांसाठी बिटकॉइनचा वापर केल्याचा आरोप केला होता. तसेच भाजपचे खासदार, प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनीही मंगळवारी रात्री पत्रकार परिषद घेऊन कॉल रेकॉर्डिंग्स व व्हॉट्सअॅप चॅट्सचे स्क्रीनशॉट प्रसिद्ध केले होते. खा. सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांच्या कथित आवाजातील ऑडिओ क्लिपही समोर आली होती. आता या प्रकरणी ‘ईडी’ने मोठी कारवाई केली आहे.
खा. सुळे यांच्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये ज्या गौरव मेहताचा उल्लेख झाला, त्याच्या रायपूरमधील घरी ‘ईडी’ने धाड टाकली आहे. २०१८ मध्ये झालेल्या क्रिप्टोकरन्सी घोटाळ्याप्रकरणाचा तपास करण्यासाठी धाड टाकल्याचे सांगण्यात आले. माजी आयपीएस अधिकारी रवींद्र पाटील यांनी २०१८ च्या क्रिप्टोकरन्सी घोटाळ्यात मेहता हा प्रमुख आरोपी असल्याचे म्हटले होते. मेहता हा एका ऑडिट फर्मचा कन्सलटन्ट असून पुणे पोलिस ६,६०० कोटींच्या क्रिप्टोकरन्सी घोटाळ्याप्रकरणी त्याची चौकशी करणार आहे. पाटील यांनी दावा केला, की राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गौरव मेहताला फोन करून क्रिप्टोकरन्सी घोटाळ्यातील रक्कम निवडणुकीच्या कामासाठी मागितली होती.
पाटील यांनी आरोप केला, की खा. सुळे आणि पटोले यांनी २०१८ च्या बिटकॉइन घोटाळ्याचा गैरवापर केला असून या घोटाळ्यातील पैशांचा वापर महाराष्ट्रातील निवडणुकांसाठी केला. दरम्यान, खा. सुळे यांनी आज सकाळी मतदानानंतर माध्यमांशी बोलताना या आरोपांवर उत्तर दिले आहे. “एकतर काल संध्याकाळी मला माध्यमांमधून कळले, की असे आरोप झाले आहेत. माझ्या हातात ते व्हॉइस रेकॉर्डिंग आल्यानंतर मी पहिली गोष्ट केली, ती म्हणजे पुण्याच्या पोलिस आयुक्तांना अर्थात अमितेश कुमार यांना फोन केला. मी त्यांना सांगितले, की काही बनावट रेकॉर्डिंग फिरत आहेत आणि मला सायबर क्राईमकडे तक्रार करायची आहे. त्यांनी सांगितले, तुम्ही तक्रार करा. मी काल संध्याकाळीच ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे, की या सगळ्या रेकॉर्डिंग्ज आणि मेसेजेस खोटे आहेत. दरम्यान, भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांविरोधात आपण मानहानीचा दावा केला आहे. “आज सकाळी मी सुधांशु त्रिवेदी यांना मानहानीची नोटीस पाठवली आहे. त्यांनी मला पाच प्रश्न केले आहेत. त्यावर त्यांनी मला आव्हान दिले, की बाहेर येऊन उत्तर द्यावे. मी बाहेर येऊन उत्तर द्यायला कधीही तयार आहे. त्रिवेदी ज्या शहरात, ज्या चॅनेलवर, ज्या वेळी मला बोलवतील, त्या वेळी मी जाऊन उत्तर देईन. त्यांच्या प्रत्येक प्रश्नावर माझे उत्तर असेल ‘नाही’. सगळे आरोप खोटे आहेत. त्यामुळेच मी सायबर क्राईमकडे तक्रार केली आहे आणि नंतर मी अवमान याचिका दाखल केली आहे, असे खा. सुळे यांनी सांगितले.
पाटील यांनी खा. सुळे व पटोले यांच्यावर आरोप केल्यानंतर भाजपने हे आरोप रेटायला सुरुवात केली आहे. भाजपने मंगळवारी रात्री पत्रकार परिषद घेत पटोले व सुळे यांच्यावर आरोप केले. परदेशी चलनाचा वापर करून सुळे व पटोले यांनी निवडणुकीवर, मतदानावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांची चौकशी केली जावी, अशी मागणी त्रिवेदी यांनी केली आहे.
दरम्यान, शरद पवार यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, “जी व्यक्ती काही महिने तुरुंगात होती, त्याची नोंद तरी कशी घ्यायची? माझ्या मते त्याची नोंदही घ्यायची आवश्यकता नाही”, असे म्हणत पवार यांनी भाजपवरही निशाणा साधला. ते म्हणाले, “असे आरोप करून भाजप किती खालच्या पातळीवर जाऊ शकते याचे हे उदाहरण आहे.”