इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई : मालेगाव येथील एका व्यापाऱ्याने निवडणुकीतील गैरप्रकारांसाठी पैशांचा गैरवापर केल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) ठाणे, वाशी, मालेगाव, नाशिक, सुरत आणि अहमदाबादमध्ये व्यापारी आणि बनावट कंपन्यांशी संबंधित २४ ठिकाणी छापे टाकले. या प्रकरणात बँक खाती आणि १२५ कोटी रुपयांचा गैरवापर वापर केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी ‘ईडी’ अधिक तपास करीत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मालेगाव येथील सिराज अहमद हॅरुन मेमनने एकापेक्षा जास्त बँक खाती उघडल्याशी संबंधित छापे टाकण्यात आले आहेत. मेमनला स्थानिक पोलिसांनी अटक केली होती. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गुरुवारी सकाळी या प्रकरणाला ‘वोट जिहाद फंडिंग’ गैरव्यवहार असे म्हटले आहे. तसेच या बेनामी बँक खात्यांमधून पैसे काढून निवडणुकीत गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. सोमय्या यांनी मालेगाव पोलिसांकडे या आरोपांसाठी तक्रार केली आहे. सिराज मोहम्मदच्या २४ बेनामी बँक खात्यांसह मालेगाव, नाशिक येथील दोन बँकांमध्ये पोलिस, ईडी, प्राप्तिकर विभाग, रिझर्व्ह बँक, निवडणूक आयोग तपास करीत आहेत, असे त्यांनी ‘एक्स’ या समाज माध्यांवर पोस्ट करण्यात आले आहे.
मालेगाव पोलिसांनी ७ नोव्हेंबर रोजी सिराज विरोधात दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे ‘ईडी’ने कारवाई सुरू केली आहे. मालेगावमधील ११ स्थानिकांनी केलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सिराजवर गंभीर आरोप असून त्याला अटकही करण्यात आली आहे. सिराज बँक खात्यांचा वापर निवडणुकीसाठी करीत असल्याचा आरोप आहे. सिराजने मालेगावमधील नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेत अनेक बँक खाती उघडली होती. यामध्ये नागरिकांच्या केवायसी कागदपत्रांचा वापर करून त्यांनी शेतकऱ्यांना पैसे पाठवण्यासाठी नवा व्यवसाय सुरू करत असल्याचे भासवले होते. सिराजने त्याने कृषी व्यवसायासाठी बँक खाती उघडण्यासाठी समजावले होते. त्याबदल्यात त्याने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काम देण्याचे आश्वासन दिले होते, असे तक्रारदार जयेश मिसाळ यांनी पोलिसांना सांगितले.
सिराजने मिसाळ यांच्याप्रमाणेत इतर ११ जणांची बँकेत खाती उघडली होती. या खात्यांमध्ये कोट्यवधी रुपये जमा झाल्याचे आणि ते अन्य खात्यात वळविण्यात येत असल्याचे नंतर मिसाळ आणि अन्य खातेदारांच्या लक्षात आले. या प्रकाराचा मिसाळ आणि इतर खातेधारकांना धक्का बसला. त्यांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. सिराजने आपल्या बँक खात्यांचा गैरवापर करून त्यात बेकायदेशीरपणे पैसे हस्तांतरित केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. गेल्या दोन महिन्यांत दहा ते बारा बँक खाती उघडण्यात आली होती. ‘ईडी’ने या खात्यांमधील व्यवहारांची माहिती घेतली, तेव्हा त्यात १२५ कोटी रुपयांचे व्यवहार आढळले. निवडणुकीसाठी या रकमेचा वापर होत असल्याचा आरोप असून याबाबत ‘ईडी’ तपास करीत आहे.