इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
चेन्नईः लॉटरीतील आर्थिक फसवणूक आणि बेकायदेशीर लॉटरी विक्री प्रकरणी ‘लॉटरी किंग’ सँटियागो मार्टिन याच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज छापे टाकले. तामिळनाडूतील चेन्नई आणि कोईम्बतूरमधील सुमारे २० ठिकाणी, हरियाणाचे फरिदाबाद, पंजाबचे लुधियाना आणि पश्चिम बंगालचे कोलकाता येथे धडक कारवाई करण्यात आली.
‘ईडी’ सँटियागो मार्टिन आणि इतरांविरुद्ध २०१२ मध्ये नोंदवलेल्या लॉटरी घोटाळ्याच्या प्रकरणाची चौकशी करत आहे. यापूर्वी ‘ईडी’ने या प्रकरणी तब्बल २७७.५९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. त्यात तामिळनाडूतील मोठ्या प्रमाणात स्थावर मालमत्तांचा समावेश होता. ‘ईडी’ने मार्टिन आणि त्यांची कंपनी, फ्यूचर गेमिंग सोल्यूशन्स (पी) लिमिटेडची चौकशी केली होती.
लॉटरी नियमन कायद्याचे उल्लंघन करून राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांच्या संगतमताने लॉटरी घोटाळा झाला. १ एप्रिल २००९ ते ३१ ऑगस्ट २०१० पर्यंत पारितोषिक विजेत्या तिकिटांचे दावे वाढवून ९१०.३० कोटी रुपयांहून अधिक बेकायदेशीर नफा कमावला गेल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी ‘ईडी’ने २०२२ मद्ये अंमलबजावणी संचालनालयाने ‘फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’ आणि पश्चिम बंगालमधील त्याच्या विविध उप-वितरक आणि क्षेत्र वितरकांची ४०९.९२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती.