इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अंमलबजावणी संचालनालय (ईडी), बेंगळुरू झोनल ऑफिसने २५ व २६ जून रोजी बेंगळुरूमधील खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये सीट ब्लॉकिंग घोटाळ्याशी संबंधित १७ ठिकाणी छापे टाकले. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), २००२ च्या तरतुदींनुसार बीएमएस अभियांत्रिकी महाविद्यालय, आकाश इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, न्यू होरायझन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि या संस्थांशी संबंधित व्यक्तींच्या कार्यालय परिसरात ही शोध मोहीम राबविण्यात आली. शैक्षणिक सल्लागार सेवांमध्ये गुंतलेल्या काही संस्था आणि घोटाळ्याशी संबंधित काही खाजगी एजंटांच्या परिसरातही ही मोहिम सुरु होती.
या शोध मोहीमांदरम्यान, मनी लाँडरिंग क्रियाकलापांशी संबंधित विविध गुन्हेगारी कागदपत्रे आणि इतर डिजिटल उपकरणे सापडली असून ती जप्त करण्यात आली आहेत. खासगी संस्थांमधील लोकप्रिय व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात सीट ब्लॉकिंग आणि रोख/पैशाचा वापर केल्याचे पुरावे शोध मोहिमेत उघड झाले आहेत. संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांना या संस्थांमध्ये प्रवेशासाठी आणण्यासाठी एजंट, शैक्षणिक सल्लागार सेवा संस्थांचे एक विस्तृत नेटवर्क आहे. व्यवस्थापन कोट्यातील जागांमध्ये प्रवेश हा बहुतेक अपारदर्शक पद्धतीने रोख/पैसे अशा बाह्य विचारांवर आधारित केला जातो. गोळा केलेल्या पुराव्यांसह, शोध कारवाईदरम्यान १.३७ कोटी रुपयांच्या गुन्ह्यातून मिळालेली रक्कम (अंदाजे) देखील सापडली आणि जप्त करण्यात आली.
यापूर्वी केईए (कर्नाटक परीक्षा प्राधिकरण) ने बीएमएस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, आकाश इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, न्यू होरायझन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि अज्ञात व्यक्तींविरुद्ध आयपीसी/बीएनएसएसच्या विविध कलमांखाली दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने चौकशी सुरू केली. या महाविद्यालयांनी अज्ञात व्यक्तींशी संगनमत केले, केईएमध्ये नोंदणीकृत विद्यार्थ्यांचे लॉग-इन क्रेडेन्शियल्स मिळवले आणि प्रत्यक्षात प्रवेश न घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नावाने त्यांच्या कॉलेजमधील जागा निवडून जागा ब्लॉक केल्याचे आढळून आले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.