नवी दिल्ली – मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचा जबाब नोंदविला आहे. दोनशे कोटी रुपयांहून अधिक फसवणुकीतील आरोपी सुकेश चंद्रशेखरशी संबंधित प्रकरणी ईडीने दिल्लीत चार तास जॅकलिन फर्नांडिसची चौकशी केली. चौकशी केल्यानंतर धन-शोधन निवारण अधिनियम (प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँड्रिंग अॅक्ट) अंतर्गत साक्षीदार म्हणून जॅकलिनचा जबाब नोंदविण्यात आला. ईडीने गेल्या आठवड्यात सुकेश चंद्रशेखरच्या ठिकाणांवर छापा टाकल्यानंतर चेन्नईमध्ये समुद्रकिनारी एका भव्या बंगला, ८२,५ लाखांची रोकड, दोन किलो सोने, १६ कार आणि इतर महागड्या वस्तू जप्त केल्या होत्या. निवडणूक आयोग लाच दिल्याप्रकरणासह दिल्लीतील एका व्यावसायिकाकडून प्रकरण दाबण्याच्या बदल्यात कोट्यवधी रुपये लाटल्याच्या आरोपाखाली सुकेश चंद्रशेखर कारागृहात आहे.
एआयएडीएमकेचे नेते टी. टी. व्ही. दिनाकरण यांच्या गटाला दोन पानाचे निवडणूक चिन्ह देण्याच्या बदल्यात लाच घेतल्याच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी २०१७ मध्ये सुकेश चंद्रशेखरला अटक केली होती. रोहिणी येथील कारागृहात असलेल्या सुकेशला या वर्षी ८ ऑगस्टला दिल्ली पोलिसांच्या विशेष दलाने व्यावसायिकाकडून ५० कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी अटक केली होती. रोहिणी कारागृरहात मारलेल्या छाप्यादरम्यान दिल्ली पोलिसांना सुकेशच्या बॅरेकमध्ये २ मोबाईल फोन सापडले होते. सुकेश स्वतःला मोठा सरकारी अधिकारी सांगून व्यावसायिकांविरोधात सुरू असलेल्या चौकशीत मध्यस्थी करून त्यांच्याकडून पैसे उकळत होता. नंतर आर्थिक गुन्हेगारी (ईओडब्ल्यू) शाखेला हे प्रकरण सोपविण्यात आले. त्याअंतर्गत मनी लाँड्रिगचा गुन्हा नोंदविण्यात आला होता.