पुणे – जीवनशैली आणि खाण्या-पिण्याच्या सवयींमुळे सध्याच्या युवा पिढीला असे आजार होत आहेत जे पूर्वी वय वाढल्यानंतर होतात असे मानले जायचे. ऑस्टियोपोरोसिस असाच एक आजार आहे. गेल्या काही वर्षांपासून २५-४० वर्षांच्या नागरिकांना हा आजार होत असल्याचे आढळून आले आहे. माणसाची हाडे ठिसूळ किंवा दुर्बळ होण्याच्या आजाराला ऑस्टियोपोरोसिस असे म्हणातात. हा आजार झालेल्या माणसाला छोटी दुखापत जरी झाली तरी त्याचे हाड मोडण्याचा धोका असू शकतो. प्रारंभिक टप्प्यात याची कोणतेही लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे याला सायलेंट डिसिस असे म्हणातात.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ऑस्टियोपोरोसिसने गंभीर रुग्ण शिंकले किंवा खोकले तरी त्यांचे हाड फ्रॅक्चर होण्याचा धोका असतो. युवा पिढीमध्ये वेगाने या आजाराचे निदान केले जात आहे. त्यामुळे त्याच्यापासून बचाव करण्यासाठी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. ऑस्टियोपोरोसिसच्या लक्षणांना ओळखून तो वाढू नये यासाठी प्रयत्न करायला हवेत. या आजाराची काय लक्षणे आहे हे जाणून घेऊयात
हाडे सहज फ्रॅक्चर होणे
डॉ. काझी सांगतात, हाडे ठिसूळ होणे हे ऑस्टियोपोरोसिसचे प्रमुख लक्षण आहे. त्यामुळे सारखे तुमच्या हाडांचे फ्रॅक्चर होत असेल तर तुम्ही सतर्क राहायला हवे. ऑस्टियोपोरोसिसच्या धोक्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. जसा वेळ जाईल तसा हा आजार बळावत जाईल आणि गंभीर रूप धारण करेल.
आधार न घेता उठण्यास त्रास होणे
फरशीवर बसून किंवा मांडी घालून जेवण्याची नागरिकांची सवय कमी होत चालली आहे. जर जेवण झाल्यानंतर किंवा योगासने केल्यानंतर आधार न घेता तुम्हाला उठण्यास त्रास होत असेल तर पाठीचा कणा किंवा कमरेच्या हाडांचे घनत्व कमी होत असल्याचे हे संकेत आहेत असे समजावे. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये ही समस्या अधिक जाणवते. ऑस्टियोपोरोसिसचे हे प्रारंभिक लक्षणे आहेत.
वस्तू पकडण्यास त्रास
कोणत्याही वस्तू पकडणे किंवा चांगली ग्रिप बनविण्यास जर तुम्हाला त्रास होत असल्याचा अनुभव येत असेल तर सतर्क व्हा. हाडांच्या संबंधित त्रासाचे हे प्रारंभिक संकेत आहेत असे समजावे. हाडांचे घनत्व कमी होत असल्याने तुम्हाला कोणत्याही वस्तूवर ग्रिप तयार करण्यास त्रास होत आहे. त्यानंतर ऑस्टियोपोरोसिसचा धोका वाढत जातो.
नखे सहज तुटणे
नखे तुटल्याच्या स्थितीकडे आपण जास्त लक्ष देत नाहीत. हाडे आणि नखांमध्ये डायसल्फाइड बाँड असतो. नखे खूपच सहजतेने तुटत असतील तर डायसल्फाइड बाँड तकलादू झाला आहे असे समजावे. वेळे जाईल तसा हा त्रास तुम्हाला हाडांपर्यंत घेऊन जाईल. त्यामुळे जर तुमची नखे सहज आणि पुन्हा पुन्हा तुटत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.