इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – माणसाचा वंश चालविण्याचे महत्त्वाचे कार्य स्त्रीच्या हातून पार पाडण्याची निसर्गाची योजना आहे. मासिकपाळी सुरु झाली म्हणजे मुलीची माता बनण्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी सुरु झालेली असते. प्रत्येक स्त्रीच्या जीवनातील ती एक महत्त्वाची घटना असते. सर्व अवयवांचे काम व्यवस्थित चालू असल्याची ती पावतीच आहे. म्हणूनच मासिक पाळीस निसर्गाचे वरदान मानतात. यामुळेच मुलगी विवाहानंतर योग्य वेळी आई होऊ शकते. परंतु आजच्या काळात मुलींना लवकर मासिक पाळी येण्याची कारणे काय? आणि त्यांच्या मानसिक त्याचा आरोग्यावर परिणाम होतो याचा स्त्री रोग तज्ज्ञांनी दिलेला सल्ला हे जाणून घेणे आवश्यक आहे.
मुलगी वयात आली की दर महिन्याला एक स्त्रीबीज बिजाडांतून पक्व होऊन बाहेर पडते. त्याच्या वाढीसाठी गर्भाशयात एक आच्छादनही तयार केले जाते. योग्य काळात स्त्री व पुरुषाच्या वीर्यातील पुरूषबीज व स्त्रीच्या गर्भाशयातील स्त्रीबीज यांचा संयोग होऊन गर्भ तयार होतो. पण ज्यावेळी हे स्त्रीबीज फलित होत नाही त्यावेळेस फलित ण झालेल्या बिजासहित आच्छादन बाहेर टाकले जाते. ते रक्ताच्या स्वरुपात योनीमार्गाद्वारे बाहेर टाकले जाते म्हणून हा रक्तस्त्राव होतो.
मुलींमध्ये मासिक पाळी येण्याचं विशिष्ट वय असतं. त्याआधी मुलींच्या शरीरात बदल होतात. पण गेल्या काही वर्षात मुलींना मासिक पाळी येण्याचे वय खूपच अलिकडे सरकलं आहे. कोरोना नंतरच्या काळात सुमारे १० वर्षांच्या आतील मुलींमध्ये मासिक पाळी येण्याचे प्रमाण वाढले मासिकपाळी चालू असताना पूर्ण विश्रांतीची गरज नाही. मात्र अतिकष्टाची कामे करू नयेत. पण घरातील नेहमीची कामे करावीत. ज्यांना पोटदुखी किंवा कंबरदुखी याचा अधिक त्रास असेल किंवा अंगावरून जास्त जात असेल तर मात्र विश्रांती घ्यावी.
कोरोनानंतर ६ ते ९ वर्ष वयोगटातील मुलींमध्ये पौगंडावस्था येण्याचे प्रमाण वाढलेले आहे. मात्र मुलींना लवकर पाळी येणं ही समस्या काही आताच उद्भवली नाही. भारतात पाळी सुरु होण्याचं सर्वसाधारण वय साडेअकरा वर्षं आहे, अमेरीकन मुलींपेक्षा हे सुमारे एक वर्ष अलीकडे आहे. एकूणच आपल्या आजूबाजूच्या वातावरणात खूप बदल झालेयत. आपली जीवनशैली कमालीची बदलली असून ती निसर्गापासून दूर दूर जाते आहे, म्हणून मुलींमध्येही हा बदल घडत आहे.
आपल्या देशात भाज्या, फळं आणि इतर पिकं जोमानं यावीत यासाठी मोठ्या प्रमाणात रसायनांचा वापर होतो. दूध देणारे गाई-म्हशीसारखे प्राणी हाच चारा खातात. त्यामुळे डेअरी पदार्थांमध्ये या रसायनांचं प्रमाण लक्षणीय आहे. तीच गोष्ट चिकन, मटण, मासे यांची. शिवाय आपण वापरतो ती प्लास्टिकची भांडी, बाटल्या यातूनसुद्धा खूप रसायनं आपल्या पोटात जात आहेत. ही रसायनं आपल्या शरीराला गोंधळवून टाकतात. मुख्यत: आपली हॉर्मोन्स तयार करणारी संप्रेरकसंस्था खूपच गडबडते. ही किंवा ईडीसी ही रसायनं वातावरणातल्या अनेक घटकांमध्ये सापडतात. त्यामुळे वयात येण्याचे बदल आजकाल लवकर सुरू होतात.
त्याचबरोबर वाढलेली स्थूलता आणि टीव्ही-कॉम्प्युटरच्या पडद्यासमोर घालवलेला अतिरिक्त वेळ हेही लवकर पाळी यायला कारणीभूत ठरतात असं आढळून आलं आहे. पाळी सुरू झाल्यावर सगळ्यांत महत्त्वाची असते स्वच्छता. पण ती नीट करता येण्याजोगी परिपक्वता अजून आलेली नसते. दुसरं म्हणजे पाळीच्या अंतर्गत घटनेबरोबर बाहेरून पटकन दिसणारे अनेक बदल होत असतात. त्यांना तोंड देणं मुलींना आणि त्यांच्या आयांनाही आव्हानात्मक वाटते.
प्रत्यक्ष पाळी सुरू होण्याआधी मुलींची उंची जोमानं वाढायला लागते. साहजिकच या मुली वर्गात उंच आणि मोठ्या दिसायला लागतात. पण एकदा का पाळी सुरु झाली की हाडांची वाढती टोकं जुळतात आणि उंचीची वाढ होणं बंद होतं. त्यामुळे सुरुवातीला जरी उंच दिसत असल्या तरी त्यांची फायनल उंची तशी कमीच असते. या शारीरिक अडचणींबरोबरच काही सायकोसोशल किंवा मनोसामाजिक समस्या येतात. त्या हाताळायला जरा जास्त अवघड जातात.
आपल्या शरीरप्रतिमेविषयी मुली खूप जागरूक होतात. दिसताना जरी मोठ्या दिसत असल्या तरी या मुली खरंतर लहानच असतात. लोक मात्र त्यांच्याकडून परिपक्व वागण्याची अपेक्षा करतात. आपल्याकडे मुलगी वयात आली की, तिच्यावर जी बंधनं घातली जातात ती फार लवकर या मुलींवर येतात. काही वेळा मुली आपल्या मानसिक वयापेक्षा शारीरिक वयाच्या जवळ येणाऱ्या, थोडया मोठ्या मुलींशी मैत्री करतात. त्यामुळे व्यसनं, असुरक्षित लैंगिक संबंध, त्याबाबतचे प्रयोग, डिप्रेशनसारखे मानसिक आजार हेही यांच्यात जास्त आढळतात. मुख्य म्हणजे हे सगळं त्यांना समजावून सांगणं काहीसं अवघड असते, कारण त्यांचा मेंदू अजून तितका विकसित झालेला नसतो.
खरे म्हणजे या बदलांचा स्वीकार करण्याशिवाय गत्यंतर नाही. मुलींनी आपल्याही मनाची तयारी त्यासाठी करायला हवी. पाळी येणं ही गोष्ट पूर्वीइतकी त्रासदायक राहिलेली नाही. आज चांगल्या प्रतीचे सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध आहेत. बहुतांश शाळांमध्ये बाथरूम्सची सोय आहे. आणि आपल्याला वाटतं त्यापेक्षा मुली या बदलांना बऱ्याच सहजतेनं सामोऱ्या जातात ही एक दिलासा देणारी गोष्ट आहे.
प्रिकाॅशस म्हणजे वेळेआधीच पाळी येणं असं म्हणतात. वेळेआधीच मासिक पाळी येण्यामध्येही दोन प्रकार आढळतात. मासिक पाळी येण्याआधी मुलींच्या शरीरात नैसर्गिक असे जैविक बदल होतात. हार्मोन्समध्ये बदल झाल्यानंतर त्यांची उंची वेगानं वाढायला लागते. एखाद दीड वर्ष उंची वाढली की त्यानंतर मासिक पाळी सुरु होते. बदलांचा हा सर्व क्रम पार होवून जर मासिक पाळी आली असेल तर त्याला ‘नाॅर्मल प्युबर्टी’ असं म्हणतात. पण मुलींच्या शरीरात हे बदल खूप आधी होवून पाळी आली असल्यास याला लवकर पाळी येणं असंच म्हणतात. या प्रकारात मुलींच्या शरीरात एकूणच लय बिघडल्यामुळे समस्या निर्माण होते. हे असं होण्यामागे विशिष्ट कारणं आहेत.
वैद्यकीय आजारांमुळे मुलींमध्ये पाळी लवकर येते. म्हणजे थायराॅइड हार्मोन्समध्ये असंतुलन झाल्यास, मेंदूमध्ये पिच्युरटी नावाची ग्रंथी असते त्या ग्रंथीत जर गाठ झाली किंवा ट्युमर झाला तरी पाळी लवकर येते. किडनीच्यावर ॲड्रिनल नावाची ग्रंथी असते, त्या ग्रंथीमध्ये जे हार्मोन्स तयार करण्याची जी क्षमता असते त्यात बदल झालेला असतो त्यामुळेही पाळी लवकर येवू शकते. मुलींचं जे अंडाशय आहे, त्याच्याशी निगडित काही आजार असल्यास मासिक पाळी वेळेआधीच येते. लहान वयोगटतल्या मुलांमध्ये समाज माध्यमांचा वापर वाढला आहे. समाज माध्यमांवरील विषय, त्यातून होणारे मानसिक परिणाम, विचारसरणी यामुळे लवकर वयात येण्याला पाठबळ मिळते.
मुलींना जर लवकर पाळी आली आहे असं आढळलं तर ही पाळी लवकर आली आहे की शरीरातील ताल लय बिघडून त्या समस्येमुळे पाळी लवकर आली आहे. हे समजून घेणं आवश्यक आहे. कारण लवकर पाळी आल्यानं या मुलींमधली सर्व यंत्रणा लवकर काम करायला लागते. लवकर पाळी आलेल्या मुलींना कमी वयात रक्तदाब, मधुमेह होण्याची शक्यता असते. या मुलींमध्ये पुढे हदयविकाराचा धोका, अर्धांग वायू किंवा ब्रेन स्ट्रोक येणे याचा कमी वयात धोकाही असतो. लवकर पाळी आल्यास मुलींची उंची वाढत नाही. उंची वाढण्यास अडथळे येतात. लवकर मासिक पाळी येण्याचे त्यांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. मुलींमध्ये न्यूनगंड निर्माण होतो. स्वत:च्या बाॅडी इमेजबद्दल प्रश्न निर्माण होतो.
सर्वात महत्वाचं म्हणजे हे असं होवू नये यासाठी मुलींच्या शारीरिक हालचाली जास्त होतील, त्यासाठी त्या भरपूर खेळतील याकडे पालकांनी लक्ष द्यायला हवं. मुलींनी कमीत कमी १ तास तरी रोज खेळायला हवं. मुलींच्या आहाराकडे लक्ष द्यायला हवं. पोषणयुक्त घरचा आहार मुलींना मिळणं आवश्यक आहे. सोशल मीडिया बघणं, गेमिंग, मोबाइल किंवा कम्प्युटरवर चित्रपट बघणं याचा परिणामही हार्मोन्सवर होतो हे अभ्यासात आढळून आलं आहे. त्यामुळे मुलींचा स्क्रीन टाइम कमी करणं गरजेचं आहे. मुलींनी व्यवस्थित झोप घेणं आवश्यक आहे, असे स्त्री रोग्य तज्ज्ञांनी सांगितले.
Early Puberty Menstrual Cycle Reasons Health Girls