सांगली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र शासनाच्या ई-पिक पाहणी ॲपद्वारे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची नोंद 7/12 वर करावी . ई-पिक पाहणी ॲपचा प्रभावी वापर व्हावा यासाठी महसूल, कृषी, जलसंपदा विभाग व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांची संयुक्त समिती तयार करण्यात यावी. या समितीच्या माध्यमातून ई-पिक पाहणी ॲपचा वापर वाढावा यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. यासाठी लागणारा निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिला जाईल. तरी ई-पिक पाहणी ॲपचा प्रचार व प्रसार करावा. असे आदेश जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले.
खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक-2022 पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात घेण्यात आली. या बैठकीस सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आमदार अरूण लाड, आमदार अनिल बाबर, आमदार मानसिंगराव नाईक, प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार वेताळ, जिल्हा मध्यवती सहकारी बँकेचे संचालक बाळासाहेब व्हनमोरे प्रांताधिकारी, तहसिलदार, उपविभागीय कृषि अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
ई-पिक पाहणी ॲपवर शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची नोंद केल्यास आपत्तीच्या काळात याचा अधिक फायदा होणार आहे. आपत्तीमुळे होणारे नुकसान याची आकडेवारी निश्चित करण्यास मदत होईल. यामुळे मदत देणे ही सोईचे होईल. तसेच शेतकऱ्यांना विमा, नुकसान भरपाई देणे शासनाला सोयीचे होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनीही ई-पीक पाहणी ॲपवर आपल्या पिकांची नोंद करावी असे आवाहन पालकमंत्री जयंत पाटील यांनी करुन सांगली जिल्ह्यात खरीप हंगाम व्यवस्थितपणे पार पडावा यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक बी-बियाणे, खते, कीटकनाशके यांचा सुलभ व सुरळीतपणे पुरवठा व्हावा यासाठी आवश्यक ते सर्व नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.
जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी मागेल त्याला शेततळे, पांडुरंग फुंडकर फळबाग योजना, रोजगार हमी योजनेतून शेततळे इत्यादी योजना सांगली जिल्ह्यात सुरु कराव्यात अशी मागणी केली. यास अनुसरुन पालकमंत्री जयंत पाटील यांनी संबधित सर्व विभागांनी प्रस्ताव तयार करावा, याबाबत शासन स्तरावर बैठक आयोजित करण्यात येऊन संबधित योजना जिल्ह्यात सुरु करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे यावेळी सांगितले. तसेच जिल्ह्यामध्ये फळ पिकविमा योजनेअंतर्गत बदल करण्यात आल्यामुळे जिल्ह्याला 23 कोटी रुपये विमाच्या लाभ मिळाला आहे. फळपिक विमा योजनेच्या नियामांमध्ये आणखीन सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केले जातील असेही ते यावेळी म्हणाले.
सांगली जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र 8 लाख 61 हजार हेक्टर असून, निव्वळ पिकाखालील क्षेत्र 5 लाख 76 हजार 903 हेक्टर आहे. वहीती खालील क्षेत्र 7 लाख 15 हजार 600 हेक्टर आहे. खातेदारांची संख्या 5 लाख 52 हजार 328 इतकी असून, खरीप क्षेत्र 3 लाख 56 हजार 754 हेक्टर आहे. खरीप गांवाची संख्या 633 असून रब्बी 2 लाख 20 हजार 149 हेक्टर आहे. रब्बी गावांची संख्या 103 आहे. एकूण सिंचनाखालील क्षेत्र 3 लाख 63 हजार 890 असून भूपृष्टवरील सिंचित क्षेत्र 2 लाख 80 हजार 747 तर ठिबक, तुषारद्वारे सिंचन क्षेत्र 56 हजार 700 हेक्टर आहे.
सांगली जिल्ह्यासाठी खरीप हंगाम 2022 बियांन्यांचे नियोजन केले असून खरीप 2022 साठी भात पिक 6 हजार 732 क्विंटल, ज्वारी 6 हजार 665 क्विंटल, बाजरी 2 हजार 20 क्विंटल, तूर 621 क्विंटल, मुग 327 क्विंटल, भूईमुग 1 हजार 468 क्विंटल, सुर्यफुल 15 क्विंटल, मका 6 हजार 698 क्विंटल, कापूस 8 क्विंटल, सोयाबीन 39 हजार 470 क्विंटल असे एकूण 64 हजार 24 क्विंटल बियाण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यासाठी खरीप हंगाम सन 2022-23 साठी आवश्यक खते यांचे नियोजन करण्यात आले आसून युरीया 47 हजार 469 मे. टन, डीएपी 17 हजार 919 मे. टन, एमओपी 21 हजार 581 मे. टन, एसएसपी 20 हजार 561 मे. टन, एनपीके 44 हजार मे. टन असे एकूण 1 लाख 51 हजार 530 मे. टन आवंटन करण्यात आले आहे. अशी माहिती यावेळी कृषी विभागाकडून देण्यात आली. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मका, सोयाबिन बाजरी, आडसाली धान्य, सोयाबिन पिकावरील किड रोग नियंत्रण पोस्टरचे व तुतीवरील वांझ रोग नियंत्रण घडीपत्रिकेचे अनावरण करण्यात आले. सूत्रसंचालन प्रविण बनसवडे यांनी केले.