नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इ सायकल खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी दिल्ली सरकारने मोठी घोषणा केली आहे. दिल्लीमध्ये १० हजार ई-सायकल खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ५,५०० रुपयांचे अनुदान दिले जाणार असल्याचे परिवहन मंत्री कैलाश गहलोत यांनी जाहीर केले आहे. पहिल्या एक हजार सायकल ग्राहकांना दोन हजार रुपयांचे अतिरिक्त अनुदानही दिले जाणार आहे. म्हणजेच पहिल्या एक हजार ग्राहकांना ई-सायकलवर ७,५०० रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे.
त्याशिवाय व्यावसायिक वापरासाठी जास्त किंमत असलेल्या कार्गो ई-सायकल आणि ई-कार्टच्या खरेदीवरसुद्धा दिल्ली सरकार अनुदान देणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. पूर्वी ई-कार्टसाठी वैयक्तिक ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या पहिल्या ५ हजार ग्राहकांना कार्गो ई-सायकलवर १५ हजार अनुदान दिले जाईल. परंतु आता ही वाहने खरेदी करणाऱ्या कंपनी किंवा कॉर्पोरेट घराण्यांनासुद्धा ई-सायकल खरेदी करण्यास अनुदान मिळू शकणार आहे. ई-कार्ट खरेदी करणाऱ्यांना ३० हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे, असे गहलोत यांनी सांगितले.
ई-सायकलवर अनुदान देणारे दिल्ली हे पहिले राज्य ठरले आहे. दिल्लीतील नागरिकच या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत. दिल्ली सरकारने ऑगस्ट २०२० पासून या धोरणाची सुरुवात केल्यानंतर शून्य उत्सर्जन ईव्हीला प्रोत्साहन देण्यासाठी ५९.४४ कोटी रुपयांचे एकूण अनुदान दिले आहे, असेही त्यांनी सांगितले.
प्रदूषणविरोधी लढ्यात आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलत असल्याचे सांगत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ई-सायकल खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे अभिनंदन केले आहे. ई-सायकलचा वापर केल्यामुळे प्रदूषण कमी करण्यास मदत मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
भारताने पेट्रोल-डिझेलचा वापर आणि प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशान ई-वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण अवलंबले आहे. त्याअंतर्गत केंद्र आणि राज्यांकडून ई-वाहनांवर अनुदान दिले जात आहे. त्याअंतर्गतच दिल्ली सरकारकडून ई-सायकलवर अनुदान दिले जात आहे.