नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटवस्तू म्हणून मिळालेल्या १२०० हून अधिक प्रतिष्ठित आणि संस्मरणीय स्मृतीचिन्हांच्या आणि भेट वस्तूंचा ई लिलाव संस्कृती मंत्रालयाने आयोजित केला आहे. यंदाचे हे चौथे पर्व आहे. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२२ दरम्यान हा ई लिलाव होणार आहे. केंद्रीय संस्कृती, पर्यटन आणि ईशान्य क्षेत्र विकास विभाग मंत्री जी. किशन रेड्डी यांनी या आगामी लिलावाबद्दल प्रसारमाध्यमांना माहिती दिली. संस्कृती आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि सांस्कृतिक आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखीही यावेळी उपस्थित होत्या.
२०१९ मध्ये या वस्तूंचा लोकांसाठी खुल्या बोलीद्वारे लिलाव करण्यात आला. त्यावेळी पहिल्या फेरीत १८०५ भेटवस्तू आणि दुसऱ्या फेरीत २७७२ भेटवस्तू लिलावात ठेवण्यात आल्या होत्या. २०२१ मध्ये, सप्टेंबरमध्ये देखील ई-लिलाव आयोजित करण्यात आला होता आणि लिलावात १३४८ वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. यावर्षी सुमारे १२०० स्मृतीचिन्ह आणि भेटवस्तू ई-लिलावात ठेवण्यात आल्या आहेत.नवी दिल्लीतील राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयात, स्मृतिचिन्हांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. या वस्तू संबंधित संकेतस्थळावरही पाहता येतील”, अशी माहिती केंद्रीय संस्कृती, पर्यटन आणि ईशान्य क्षेत्र विकास विभाग मंत्री जी. किशन रेड्डी यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
लिलावामधील स्मृतीचिन्हांमध्ये उत्कृष्ट चित्रे, शिल्पे, हस्तकला आणि लोक कलाकृतींचा समावेश आहे. यापैकी अनेक वस्तू म्हणजेच पारंपरिक पोशाख, शाल, पगडी, समारंभातील तलवारी या नेहमी भेटवस्तू म्हणून दिल्या जातात. अयोध्येतील श्री राममंदिर आणि वाराणसीतील काशी-विश्वनाथ मंदिराच्या प्रतिकृती आणि नमुन्यांचा समावेश असलेल्या इतर स्मृतीचिन्हांचाही यात समावेश आहे.
आमच्याकडे क्रीडाविषयक संस्मरणांचा देखील आकर्षक विभाग आहे.” राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा २०२२, डेफलिम्पिक्स २०२२ तसेच थॉमस चषक क्रीडास्पर्धा २०२२ या स्पर्धांमध्ये भारतीय संघाने केलेल्या चमकदार कामगिरीमुळे आपण क्रीडा स्पर्धांच्या इतिहासात मानाचे स्थान आणि पदकांची भरघोस कमाई केली. क्रीडास्पर्धांतील यशस्वी संघ आणि विजेते यांच्या संस्मरणांचा देखील लिलाव होत आहे. लिलावाच्या या भागात २५ नवी क्रीडा संस्मरणे विक्रीसाठी उपलब्ध आहेत अशी माहिती केंद्रीय मंत्री जी.किशन रेड्डी यांनी उपस्थितांना दिली.
केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले, “नरेंद्र मोदी हे देशाचे पहिले असे पंतप्रधान आहेत ज्यांनी त्यांना मिळालेल्या सर्व भेटवस्तूंचा लिलाव करण्याचा आणि त्यातून मिळणारे उत्पन्न देशाची जीवनवाहिनी असणाऱ्या गंगा नदीच्या संवर्धनासाठी सुरु करण्यात आलेल्या नमामि गंगे या समाजकल्याणकारी कार्याला देण्याचा निर्णय घेतला आहे. याप्रसंगी बोलताना, केंद्रीय संस्कृती आणि संसदीय व्यवहार राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल म्हणाले, “गेल्या वेळी झालेल्या अशा प्रकारच्या लिलावात देशाच्या प्रत्येक राज्याच्या आणि विविध प्रकारच्या जातीधर्माच्या लोकांनी सक्रीय सहभाग घेतला.” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या प्रतिष्ठित आणि संस्मरणीय भेटवस्तूंच्या लिलावात लोकांनी यावर्षी देखील भरभरून सहभाग नोंदवावा अशी विनंती त्यांनी जनतेला केली.
केंद्रीय संस्कृती आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी बोलताना पंतप्रधानांना मिळालेल्या विविध स्मृतीचिन्हांचे महत्त्व तसेच हा लिलाव कशा प्रकारे सामान्य नागरिकांना ‘नमामि गंगे’ उपक्रमात योगदान देण्याची अपूर्व संधी देतो आहे, यावर भर दिला. या भेटवस्तू, स्मृतीचिन्हे आणि इतर वस्तू पाहण्यासाठी आलेल्या लोकांना ही भेट अधिक आनंददायी ठरावी म्हणून, या ठिकाणी मार्गदर्शकासोबतच्या फेऱ्या तसेच श्रवणदोष असलेल्या दिव्यांगांसाठी खुणांची भाषा येत असलेल्या मार्गदर्शकासोबतच्या फेऱ्या आयोजित करण्यात आल्या आहेत.
दृष्टीदोष असलेल्या दिव्यांग लोकांसाठी येथील वस्तूंची यादी आणि किंमत यांची माहिती देणारे ब्रेल भाषेतील कॅटलॉग देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जनतेसाठी या वस्तूंच्या प्रदर्शनाचा विभाग 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत खुला असून त्यात सर्वांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. या लिलावातून मिळणारे उत्पन्न समाजकल्याणकारी कार्यात योगदान देण्यासाठी म्हणजेच आपली राष्ट्रीय नदी असलेल्या गंगेच्या संवर्धन आणि पुनरुज्जीवनासाठी केंद्र सरकारतर्फे सुरु करण्यात आलेल्या महत्त्वाच्या ‘नमामि गंगे’ या उपक्रमासाठी देण्यात येणार आहे. ई-लिलावात सहभागी होण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी खालील लिंकवर क्लिक करून नोंदणी करावी: https://pmmementos.gov.in
PM Narendra Modi Memento Gift E Auction