त्र्यंबकेश्वर ( इंडिया दर्पण वृत्तसेवा ) – त्र्यंबकेश्वर येथील श्रीराम मंदिर संस्थेत श्रीराम जन्मोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. चैत्र शु. प्रतिपदा बुधवार २२ मार्च ते चैत्र व. प्रतिपदा, शुक्रवार ७ एप्रिल या कालावधीत हा सर्व उत्सव साजरा होणार असल्याची माहिती श्रीराम मंदिर संस्थेच्यावतीने संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र उर्फ बाळासाहेब कळमकर यांनी दिली.
बुधवार २२ मार्च रोजी प्रातःकाली ध्वजारोहणाद्वारे श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याचा शुभारंभ होणार असून श्रींची महापूजा संपन्न होणार आहे. उत्सवादरम्यान रोज सकाळी पंचसूक्त पवमान अभिषेक होईल. तसेच प्रतिपदा ते पौर्णिमा दरम्यान रोज दुपारी ४ ते ५ या वेळेत श्रीराम महिला भजनी मंडळाच्या वतीने सुश्राव्य भजन सादरीकरण केले जाणार आहे. सायंकाळी ५ ते ६ यावेळेत विविध विषयांवर डॅा. सत्यप्रिय ज्ञानेश्वर शुक्ल, डॉ. अनिरुद्ध रविंद्र अग्निहोत्री, मिलिंद महादेव तानपाठक, सौ. स्वाती मनोज थेटे, सौ. पल्लवी मोहिनीराज शिंगणे, सौ. सुवर्णा योगेश देवकुटे, सौ. प्रणिता कौस्तुभ पाटणकर, सौ. भारती सतिष वैद्य, विशाल रविंद्रबुवा कविश्वर, शंतनु रामचंद्र कळमकर, सौ. वृंदा चेतन लोहगांवकर, कौस्तुभ किशोरशास्त्री पाटणकर, विनय सुनिल ढेरगे, ह.भ.प. योगेश सोपान गोसावी, आदी मान्यवरांचे व्याख्यान होणार आहेत. तसेच रोज सायंकाळी ७ ते ८ या वेळेत आरती व मंत्रपुष्पांजली होईल. श्रीराम जन्मोत्सवा निमित्त रोज रात्री ९ ते ११ या वेळेत नारदीय कीर्तन आयोजीत करण्यात आले असून ह.भ.प. सौ. मीनाक्षी रामचंद्र कळमकर, ह.भ.प. रवींद्र कृष्णाजी अग्निहोत्री, ह.भ.प. सौ. श्रद्धा चंद्रशेखर शुक्ल, ह.भ.प. रामचंद्रबुवा प्रभाकर भिडे, पुणे, ह.भ.प. चंद्रशेखरबुवा विष्णुबुवा शुक्ल हे नारदीय कीर्तन सेवा देणार आहेत. कीर्तन सेवेत सदानंद टोके हे संवादिनी वादन सेवा तर धनंजय महाजन हे तबला वादन सेवा देणार आहेत.
श्रीराम जन्मोत्सवाचा मुख्य सोहळा चैत्र शु. नवमी, श्रीराम नवमीचे दिवशी होईल. श्रीराम नवमीनिमित्त सकाळी १० वाजता ह.भ.प. रवींद्र कृष्णाजी अग्निहोत्री हे श्रीराम जन्मोत्सवाचे कीर्तन सादर करणार असून सकाळी १२.३० वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांचे हस्ते तसेच श्रीक्षेत्र दत्तधाम गोवर्धन, नाशिकचे प.पू. श्री. दत्तदासजी महाराज यांचे उपस्थितीत विविध मान्यवरांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
पीएच डी प्राप्त करुन नगरीच्या नावलौकीकात भर घातल्याबद्दल डाॅ. इंजि. सिद्धार्थ रविंद्र धारणे, डॉ. अनिरुद्ध रविंद्र अनिहोत्री, वे. मु. शंतनु रामचंद्र कळमकर, भगवान त्र्यंबकेश्वराचे प्रात:पुजक समीर कृष्णाजी दशपुत्रे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. दुपारी १२-४० वाजता श्रीराम जन्मोत्सवाचा सोहळा संपन्न होईल. तसेच श्रीराम नवमीचे दिवशी रात्री ९ वा. ह.भ.प. रविंद्रबुवा मधुसूदन कविश्वर, यांचे श्रीराम जन्मोत्सव समाप्ती कीर्तन होईल. चैत्र शु. ११, रविवार, दि. २ एप्रिल २०२३ सायंकाळी ५ वा. प्रभू श्रीराम यांच्या रथोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असुन कुशावर्त तीर्थावर श्रीरामचंद्राची महापुजा संपन्न होईल.
चैत्र शुध्द १२ , सोमवार, दि. ३ एप्रिल २०२३ रोजी दुपारी १२-०० वा. श्रीराम मंदिर येथे श्रीस महानैवेद्य, उत्सवांगभूत पारणे संपन्न होईल. रात्री ९-०० वा. कुमार गंधर्व यांचे नातु भुवनेश्वर कोमकली यांची संगीत मैफील संपन्न होईल. त्यांना हार्मोनियम वर ज्ञानेश्वर सोनवणे तर तबल्याची साथसंगत नितीन वारे करतील. चैत्र शु. पौर्णिमा, गुरुवार, दि. ६ एप्रिल २०२३ रोजी सुप्रभाती हनुमान जन्मोत्सवा निमित्त प्रवचन प्रवचनकार वेदमूर्ती मंदारशास्त्री पाटणकर यांचे प्रवचन होईल.
चैत्र कृ. १, शुक्रवार दि. ७ एप्रिल २०२३ भुवनेश्वरी माता मंदिर, गढई येथे सायंकाळी ५ वा. श्री माता भुवनेश्वरीची महापूजा व सप्तशती पाठ संपन्न होईल व माता भुवनेश्वरी पारणे होऊन सोहळ्याची सांगता होणार आहे.
दरम्यान रोज होणार्या पंचसूक्त पवमान अभिषेकाची सेवा विजन वाडेकर, रवींद्र अग्निहोत्री, शामराज देवळीकर, त्र्यंबक दीक्षित, प्रकाश गोसावी, पद्माकर पिंगळे, सदानंद टोके, श्रीकांत चानसीकर, राहुल फडके, रामचंद्र कळमकर, सतिष सरडे, संजय कुलकर्णी, अॅड. श्रीकांत गायधनी, दिपक टिल्लू यांच्यावतीने केली जाणार आहे. श्रीराम जन्मोत्सवानिमित्त आयोजीत सर्व कार्यक्रमांत भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन श्रीराम मंदिर संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.
DYCM Devendra Fadnavis Trimbakeshwar Programs