मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे राज्यात ठिकठिकाणी त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. तर काँग्रेसकडून राज्यात आंदोलन करण्यात येत आहेत. तर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी या वक्त्यव्यावर प्रतिक्रिया देऊन निषेध व्यक्त केला. या वक्तव्याविरोधात अमरावतीत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुध्दा प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देतांना सांगितले की, संभाजी भिडे गुरुजींनी जे वक्तव्य केलंय त्याचं मी पूर्णपणे निषेध करतो. महात्मा गांधी हे देशाचे राष्ट्रपिता आहेत. देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये महात्मा गांधी याच्यांकडे महानायक म्हणून पाहिलं जातं. महानायकाबाबत अशा प्रकराचे वक्तव्य करणं चुकीचं आहे. माझं स्पष्ट मत आहे की अशा प्रकारचं वक्तव्य हे भिडे गुरुजी आणि कुणीही करु नये.
अशा वक्तव्यांमुळे लोकांमध्ये संताप निर्माण होतो. लोकं महात्मा गांधी यांच्याबाबत बोललेलं कधीही सहन करणार नाहीत. याबाबत जी कारवाई करायची असेल ती राज्य सरकार करेल. महात्मा गांधी असोत किंवा स्वातंत्र्य सावरकर असोत, कुणाच्या विरोधात बोललेलं खपवून घेणार नाहीत,
संभाजी भिडे गुरुजींचा भाजपशी काहीही संबंध नाही. ते त्यांची स्वत:ची संघटना चालवतात. याला जाणीवपूर्वक राजकीय रंग देऊ नये. राजकीय रंग देण्याचं काहीही कारण नाही. तसेच जसं आता काँग्रेसची लोकं या वक्तव्याचा निषेध करत रस्त्यावर उतरतायेत, तसंच जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत अतिशय गलिच्छ राहुल गांधी बोलतात तेव्हा त्याचाही निषेध त्यांनी केला पाहिजे. मात्र ते त्यावेळेस मिंधे होतात असे फडणवीस यांनी सांगितले.